कुणास्तव.. कुणीतरी

भर दुपारची वेळ. डोक्यावर तळपता सुर्य आग ओकत होता. शिवाने आपला मोर्चा एका वस्तीकडे वळवला.

शिवा… मध्यम वयाचा, गरीबीनी गांजलेला इसम. सतत उन्हातान्हात फिरल्यामुळे रापलेला निबर वर्ण, पायात जुनाट स्लिपर्स, अंगात कळकट्ट कपडे, डोक्यावर जीर्ण टोपी, हाताशी मोडकळीला आलेली सायकल, सायकलच्या हॅंडलला दोन्ही बाजूला लटकवलेली गोणती, कॅरियरला बांधेलेली ट्यूब आणि तोंडात ठराविक पद्धतीने घालायची साद “ए भंगार बाटली रद्दीSSSSS”

आज काही मनासारखी भंगार खरेदी झाली नव्हती. संध्याकाळी आदिलशेठला काय विकणार, आणि गाठीशी पैसा कसा साठणार हिच चिंता. आदिलशेठ म्हणजे भंगार खरेदी करणारा दलाल.

काही खरेदी होईल ह्या आशेने शिवा त्या वस्तीमध्ये शिरला. सगळीकडे घरांची दाटीवाटी. एक-दोन खोल्यांची लहान लहान घरं. घरांच्याच बाहेर कचरा, पाण्याचे नळ, आंघोळ करणारी माणसं, कपडे धुणार्‍या बायका, खेळणारी मुलं, सगळीकडे नुसता गजबजाट.

“ए भंगार बाटली रद्दीSSSS, ए पत्रा लोखंड प्लास्टीSSSSक” भुकेल्या पोटीही शिवाने आपलं काम चालू ठेवलं.
“ए इधर आ” एका लुंगी नेसलेल्या वयस्कर माणसाने शिवाला हाक दिली.
“बोलो साब क्या क्या है?”
“बिअर बोतल क्या भाव लेता है?”
“साब तीन रुपया.”
“बहोत कम देता है. मार्केटमें चार रुपया मिलता है”
“नही साब, कोईभी तीन रुपयेसे ज्यादा नही देगा.”
“ठिक है चल, ना तेरा ना मेरा, साडे तीन रुपये में ले.”
“कितना बोतल है?”
“बीस-बाईस रहेगा.”

बाटली मागे दोन रुपये सुटतील. शिवाचा सौदा झाला.
सगळ्या बाटल्या गोणत्यात भरुन शिवाने परत आरोळी दिली. “ए भंगार बाटली रद्दीSSSS”आणि पुढच्या खोलीपाशी आला. खोलीचा दरवाजा अर्धवड उघडा होता. नकळत शिवाने आत एक कटाक्ष टाकला. त्याच्या दृष्टिस एक म्हातारी पडली. सुरकुत्यांनी भरलेलं शरीर, पसरलेल्या पांढुरक्या जटा. अंथरुणावर निश्चल पडलेली. त्या खोलीत अजुन कोणी आहे का हे बघायची शिवाला उत्सुकता लागली. त्याने वाकुन बघण्याचा प्रयत्नही केला पण कोणाची चाहूल लागली नाही. तिची अवस्था पाहून शिवाला वाईट वाटलं.

“ए वहां कुछ नही मिलेगा, बुढिया अकेली है. आगे जा तू.” मगाचचा माणूस त्याच्यावर खेकसला. शिवा निमुटपणे पुढे निघाला.

दिवसभर त्याचं कामाकडे मुळी लक्षच नव्हतं त्यामुळे एकुणातच त्याचा धंदा बेताचा झाला. ती म्हातारी काही त्याच्या मनातून जात नव्हती.
संध्याकाळी दिवसातील झालेली किरकोळ खरेदी घेऊन अदिलशेटकडे जमा केली.
“सेठ वो मेरे काम का कुछ हुआ क्या?” शिवाने आदिलशेठला विचारलं.
“वो नही हो सकता शिवा.” आदिलशेठने त्याला सांगितल.
शिवा हताश झाला आणि तिथून चालू पडला

रोजप्रमाणे रात्री चार पाव आणि बिडीच बंडल घेऊन तो आपल्या झोपडीकडे परतला. त्याने झोपडीत दिवा लावला, हात पाय धुवून आणलेला पाव कसल्याश्या लालभडक रस्स्यासोबत फस्त केला.

रात्री उशिरापर्यंत त्याला झोप नव्हती. म्हतारीच्या विचारात किती बिड्या शिलगावल्या त्याचा पत्ताही नव्हता त्याला. खुप अधीरतेने झोपडीबाहेर तो येरझार्‍या घालत होता. मध्यरात्रीच्या सुमारास त्याचा थोडा डोळा लागला.

सकाळी उठून शिवा आपल्या दिनक्रमाला लागला. डोळे जड होते, रात्री म्हणावी तशी झोपही लागली नव्हती. सायकलला गोणती लटकवून शिवा चालू पडला. नकळत त्याचे पाय कालच्या वस्तीकडे वळाले. वास्तविक त्याच्या धंद्यात एकदा गेलेल्या ठिकाणी पुढचे १०-१५ दिवस सहसा जात नसत. परंतु त्या म्हातारीला बघायला तो बेचैन होता.
आपली नेहमीची आरोळी ठोकत तो म्हतारीच्या घरापर्यंत पोहचला. आज मात्र घराचं दार बंद होतं. शिवा थोडा हिरमुसला. काही क्षण तिथे घुटमळून पुढे जाणार तोच मागून त्याला हाक ऐकू आली.
“ए शिवा.” त्याने वळून पाहिलं.
“गंगे तू इथं?” शिवाने विचारलं.
गंगू.. शिवाच्या झोपडपट्टीत रहाणारी मोलकरीण मुलगी.
“आर माझ्या कामाची चार घर हायेत इथं.”
“त्या म्हातारीच्या घरीभी करतीस काम?”
“नाय रे. ती बिचारी कुठून देनार माझी मजुरी? एकलीच रहाते.”
“म्हन्जे?”
“आता म्हन्जे काय?”
“म्हंजी सगं कोन नाय?”
“आसल पन ते तिला म्हाईत नाय.” शिवाने आश्चर्याने डोळे विस्फारले.
“आरं म्हातारीची सुध हरपलीय. तिला मागलं कायभी आठवना झालय.”
“आनि नवरा?”
“तो गेला पाच वर्षामागं. दोघे ह्या खोलीत रहायला आले आन तो लगेचच गेला. हिच्याबद्दल वस्तीत कोनाला काय म्हाईत नाय. पन शेजारी-पाजारी समदे काळजी घेतायत. जमेल तशी तिची मदत करतात. मी भी हातभार लावते. दिवसाआड येते आन झाडलोट करून देते.”

शिवाला गंगूचं कौतुक वाटलं “लय चांगलं करतीस बघ.”
“इथली लोकभी आसच बोलतात मला. आपन होईल तेव्हड करायच. पन आपल्याला मानतात बघ सगळे, म्हातारी पन आनि आजुबाजुचे पन.”
शिवा लक्ष देऊन ऐकत होता.
“तरी सवताची खोली हाय, नाहीतर म्हातारीचे हाल व्हते बघ.”
शिवा जरा सुखावला. “व्हय तेबी हाय.”
“बाकी तुझा धंदा पानी कसा चाल्लाय?”
“कसला काय. काय जोर नाय. आज आजुनपर्यंत खरेदी नाय बघ”
“व्हईल व्हईल. मी चलते, मला आजुन एक घर बाकी हाय.” गंगू घाईत निघाली.
शिवाने तिला अडवलं “ऐक, म्हातारीच्या घरातून काय जुन-पुरान मिळतं काय बघ की.”
“तिच्याकडे काय आसनार?”
“अग बघ की जरा. काही चालल, माझा धंदाभी व्हईल आन म्हातारीला चार पैस भी मिळतील.”
गंगू शिवाची विनवणी टाळू नाही शकली.
“बरं विचारते.”

गंगू दार लोटून खोलीत शिरली. शिवा उघड्या दारातून आत न्याहाळत होता. “आजे..” गंगूने म्हातारीला हाक मारली. ती कशीबशी अंथरूणातून उठत म्हणाली, “काय ग, काय झालं?”
“काय नाय, तुझ्याकड काही जुन लोखंड, प्लाष्टीक आसल तर बघ, बाहेर भंगार गोळा करायला आलाय.”
“लक्षात नाही येत, पण वरती माळ्यावर काही आसल.” म्हतारी थकलेल्या आवाजात म्हणाली. “तुझ्या वळखिचा हाय तो?”
“व्हय. आमच्या शेजारी रहातो, शिवा.” गंगूने माळ्यावर चढत उत्तर दिलं.
शिवा म्हातारीला एकटक निरखुन बघत होता. म्हतारीने पण त्याला एकदा पाहून न पाहिल्यासरखं केलं, तरी त्याची नजर हटली नाही.
“हे बघ हे मिळालं.”
गंगूने माळ्यावरून एक गोणतं खाली काढलं आणि बाहेर शिवासमोर ठेवलं. म्हातारीही गंगू मागे बाहेर आली.

शिवाने आतील वस्तू पाहिल्या आणि वजन न करताच म्हतारीचा हातात शंभराची नोट ठेवली. त्याच्या अशा वागण्याचं गंगूलादेखील आश्चर्य वाटलं.
गोणता पाठीला लावताना अजाणतेपणे त्याच्या तोंडून “येतो माय” असे शब्द निघाले आणि करुण भावाच्या डोळ्यांनी म्हतारीला निरोप दिला.
म्हातारी स्तब्धपणे त्याच्याकडे बघत बसली.
गंगूच्या आश्चर्याचा ओघ ओसरला तसा तिने म्हातारीचा निरोप घेतला. “येते ग आजे.”

“काय रं, एकदम शंभर रुपय?” गंगूने आपली शंका शिवापुढे मांडली.
शिवा कसल्याशा विचारा गर्क होता. “आर, काय म्हनते मी?”
“कळालच नाय मला. आलगद झालं. वाटलं गरज आसल तिला.” आजपर्यंत कोणासाठी दमडीपण न उधळलेल्या शिवाच्या औदार्याचं गंगूला आश्चर्य वाटलं.
“पण तुझ्यामुळ म्हातारीला भेटता आलं. लय बर वाटल बघ तिला भेटून. अस वाटल की ती कोनी परकी नाय.”
गंगूने स्मित केलं.
“का कुनास ठाऊक, पन मला तिला कुठतरी पाहिल्यासारखं वाटतय.”
“बर, चल निघते मी.” कामाच्या घाईने गंगूने शिवाचा निरोप घेतला.

आजही शिवाचं कामात मन लागेना. तो तिथुन तडक आपल्या झोपडीवर आला. त्याला खुप बेचैन वाटत होतं. पूर्ण दुपार त्याने बिडीच बंडल धुर करण्यात घालवली. नाहक शंभर रुपये गेल्याचं त्याच्या मनात सुद्धा आलं नाही.
काहीतरी झालं तसं ताडकन उठून म्हातारीकडून आणलेल्या वस्तु त्याने गोणत्यातून बाहेर काढल्या. त्यात जुन फुटकं घमेलं, लोखंडी तवा, रिकामे चेपलेले पेंटचे डबे, आणि बारीक सारीक लोखंडी सामान होतं.
त्यातील एका वस्तुकडे तो नुसता पहात बसला. त्याने ते अंगातल्या शर्टाने पुसलं आणि जमेल तेवढं स्वच्छ केलं. ते होतं एक छोटसं मेडल.

त्याच्या हातात जे होतं त्यावर त्याचा विश्वास बसेना. त्याने ते मेडल चारही बाजूने निरखून पाहिलं. आणि त्याचा चेहरा एकदम खुलला.
तो उठला आणि घाईने गंगूकडे आला. “गंगे, ए गंगे..”
“काय र, असा आग लागल्यागत बोंबलायला काय झालं?” गंगूच्या बापाने, केश्याने विचारलं.
“गंगू कुठ हाय?”
“आलीच बघ ती.” केश्याने मान वर करत सांगितलं.
“काय र शिवा?” गंगूने विचारलं.
“हे बघ काय.” शिवाने ते मेडल गंगूला दाखवलं.
“काय हाय हे?”
“मला विश्वास नाय बसत. तुला माहितेय ना मी पाचव्या वर्गापर्यंत शाळा केलीय.”
“व्हय. मग?” गंगूला पुर्वी शिवाने त्याने पाचवी पर्यंत शिकल्याचं सांगितलं होतं.
“मी पळन्यात पटाईट होतो. शर्यतीत नेहमी पहिला नंबर असायचा. मला आजुन डोळ्यासमोर हाय तो दिवस.” शिवा बोलताना पूर्ण हरपला होता. “शाळेत स्पर्धा चालू होती. मी नेहमीप्रमाणे जितलो आणि हे भेटलं मला.”
त्याने हातातलं मेडल त्या दोघांसमोर धरलं.
“आसल, पन आज का दावतोयस असा लगबगीनं?” गंगूने शंका काढली.
“कारन ते आज मला सापडलय.”
“आता कुठं सापडलं ते?”
“तुला विश्वास नाही बसनार, मला ते त्या म्हातारीकडून आनलेल्या मालात सापडलं.” गंभीरपणे शिवा म्हणाला.
“काय?” गंगू थबकली.
केश्याला काही कळेना. “कोन म्हातारी? कोनाबद्दल बोलतोय?” त्याने प्रश्न मांडले.
“अर बा…” गंगूने सगळी हकिकत केश्याला सांगितली.
“पन कशावरून तू सांगतोस हे तुझ हाय?” गंगूने पुन्हा शंका काढली.
“हे दिसतय?” शिवाने त्याच्यावरती कोरलेलं ‘S’ हे अक्षर दाखवलं. “मला आजुन आठवतय हे मी कोरल व्हत.”
“मला नाय बा पटत, इतकी वर्स गेली आन तुला हे आठवतय.” आता केश्याने शंका काढली.
“आर हे माझ्या हाताने कोरल व्हत. आनि हा लोखंडी डाग दिलेला दिसतोय? घरी आनताना हे माझ्या हातून पडल आनि त्याचा पितळी पत्र्याला चीर गेली म्हनून केलं मी, नायतर बा ने बेदम मारला आसता. राक्षस व्हता तो.”

शिवाच्या आई-बापाबद्दल कोणाला काहीच माहीत नव्हतं, आज पहिल्यांदाच तो आपल्या पुर्वायुष्याबद्दल आणि आई-बापाबद्दल बोलत होता.
“शेवटी सावत्रच होता ना.”
“सावत्र?” गंगूने विचारलं.
“मी लहान असतानाच माझा बा गेला. आईन दुसर लग्न केलं. आन माझा छळ झाला चालू. माझ्या आईने पन त्याला खुप विरोध नाय केला. मातेर झाल बघ माझ. घरातून हाकलला मला. जेमतेम दहा वर्साचा व्हतो.” शिवाच्या डोळ्यात पाणी दाटलं.
“गाव सोडलं नि इकडे आलो. रस्त्यावर राहिलो, उपाशी पोटी पानी पिऊन दिवस काढले र मी. तेभी आई जिती आसताना. पोट भरायला काहीच नव्हत, भीक पन नव्हती मागायची. ठोकर खात खात ह्या धंद्यात पडलो.”

शिवाने शर्टाच्या बाहिने डोळे पुसले. केश्या आणि गंगूला पण भरून आलं. केश्याने शिवाला एका मोडक्या स्टुलावर बसवलं. गंगूने पाणी आणून दिलं.

“उगाच मागच्या आठवनी नको उगाळू.” केश्याने शिवाच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं.
“पन मग ते मेडल का काय ते तिच्याकड कस आल?” गंगू पुटपुटली. “म्हनजे तिच तुझी आई तर…” वाक्य अर्धवट ठेवत, कपाळपट्टिवर आठ्या उमटवत विचार करू लागली.
शिवाच्या चेहर्‍यावरचे भाव बदलले, त्याच्या चेहर्‍यावर आश्चर्य होतं. त्याने विस्फारलेल्या डोळ्यांनी गंगूकडे पाहिलं आणि तो परत कसल्याश्या विचारांच्या अधीन झाला.
केश्याला पण नशीबाच्या ह्या खेळीचं आश्चर्य वाटलं. “आर देवा! खरच आस असल? काय म्हनाव ह्याला देवाची करनी, नशीबात पन काय काय लिवलेल आसतय.”
गंगूचा चेहरा खुलला. शिवासाठी ती खुष झाली.
शिवा मात्र धीरगंभीर. त्याच्या डोक्यात काहीतरी चालू होतं.

“आर कसला विचार करतोयस? काय झाल? तुला नाय वाटत ती तुझी आई आसल?” केश्याने विचारलं.
“आसल. मागल्या दोन दिवसात जे काय काय झालं त्याचा अर्थ आता कळतोय मला.” शिवाची नजर शुन्यात हरवलेली.
“म्हन्जे?” गंगूने विचारलं.
“म्हन्जे का माझे पाय तिच्या खोलीकड वळाल, का मला तिच्या एकलेपनाबद्दल वाईट वाटलं, का तिची काळजी वाटून राहिली आनि का शंभराची नोट माझ्या हातून नकळत गेली.”
गंगूने मान हलवून सहमती दर्शवली. “आन दुपारलाच तू मला बोलला व्हता की तुला तिला कुठतरी पाहिल्यागत वाटतयं.”
“आर हा वरच्याचा संकेत आसल, तुझ्या आन तिच्या नशिबात भेट आसल म्हनुन तुला तशी बुद्धी झाली.” केश्याने शिवाला वडीलधार्‍या माणसाच्या भुमिकेने समजावलं.
शिवाचा चेहरा धास्तावलेला होता.
“आता खुश व्हायच सोडून, असा उदास का बसलाय?” केश्याने शिवाला झटकला. “आता माय लेकरु झ्याक -हावा एकत्र.”
शिवाने नकरार्थी मान हलवली. “ते नाय शक्य.” शिवाच्या आवाजात गंभीरता होती.
“का र? येड लागला का तुला?” केश्याने शिवाला फटकारलं.
“लहानपनापासून जे हाल मी भोगलेत त्याला माझ्या सावत्र बा एवढी ती पन जवाबदार हाय. माझ आयुष्य नासवलं, ना निट आसरा, ना पोटाला चार घास. आर तो बा सावत्र होता पन ही तर सख्खी आई होती ना माझी? म का नाय कधी आडवला तिने बा ला?”
“हे बघ ती कशावरुन तुझ्या बा ला घाबरत नसल? तिला काय बोलायची, करायची मुभा नसल तर?”
केश्याच्या प्रश्नाने शिवा निरुत्तर झाला.
“आर आई तुझी ती. इतक्या वर्साने भेटली, त्या परमेस्वरानं गाठभेट घातली तुमची. आस करु नको शिवा, जे झाल इसरुन जा.” केश्याने समजावलं.
“आनि ती एकलीच हाय र, इतके महिने मी तिच्याकड जाते, लय मायाळू वाटते र.” गंगूने त्यात भर घातली.
शिवा थोड नरमला. “पटतय मला तुम्ही काय म्हनता ते.”
“उद्या जाऊ आपन तिकडे, बा तु भी चल आमच्यासोबतीन. म्हातारी लय खुष होईल आनि वस्तीवाले पन. तिची लय काळजी हाय समदयाना.”
गंगूने शिवाला बोलायची संधीच दिली नाही. ती खुप खुष होती, त्या दोघांसाठी.

रात्रभर शिवाला झोप लागली नाही. एक प्रकारची अधीरता, रुखरुख त्याच्या मनात होती.

सकाळी गंगू आणि केश्या त्याच्याकडे आले. “शिवा ए शिवा.” गंगूने शिवाला बाहेर बोलवण्यासाठी हाका मारल्या. शिवा स्वच्छ आंघोळ, बर्‍यापैकी कपडे करुन तयारच होता.
तिघेही थोड्या वेळात म्हातारीच्या घरी पोहोचले.

“आजे, ए आजे.” गंगूने दार ठोठावलं.
बराच वेळ काहीच चाहुल नव्हती.
“आजे..” गंगूने पुन्हा हाक मारली.
चार-पाच शेजारीही जमले. सगळ्यांना काळजी वाटू लागली. आता सगळ्यांनीच म्हतारीला हाका मारायला सुरुवात केली.
“काल रात्री खोकत होती जोरात” जमलेल्यापैकी एकजण बोलला “मला वाटलं नेहमीसारखं असेल..”
शिवालाही काळजी वाटू लागली. मनात शंकेची पाल चुकचुकली, भलते-सलते विचार येऊ लागले.
तेव्हड्यात म्हतारीने ग्लानीने भरलेल्या डोळ्यांनी दार उघडलं. सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.
“काय किती येळ ग.” गंगू फक्त रडायची शिल्लक होती.
“आग डोळा लागला होता.”
शिवाला तिथे आलेला बघून तिला आश्चर्य वाटलं.
“आजे तुझ्यासाठी खुषखबर हाय बघ. आनि आपल्या समदयांसाठी भी.” गंगूने तिने जमलेल्या सगळ्यांना सांगितलं.
“व्हय.” केश्याने शिवाच्या खांद्यावर हात ठेवत सगळ्यांची उत्सुकता वाढवली.
त्या सगळ्यांइतका शिवाही अधीर झाला होता, सगळ्यांची आणि म्हातारीची प्रतिक्रिया बघायला.

जवळ जवळ सगळ्यांनी काय खुषखबर म्हणून विचारलं. गंगू स्मित करत म्हातारीकडे बघत होती.
“बोल की ग, काय आहे?” म्हातारीने विचारलं. गंगूने शिवाकडे पाहिलं. त्याची नजर म्हातारीच्या चेहर्‍यावर खिळलेली. डोळ्यात तेच करूण भाव, त्यात काहितरी मिळवण्याची आस होती.

“आजे तु एकली न्हाईस. तुला एक मुलगा हाय.” म्हातारी थबकली, तिला आपल्या कानांवर विश्वास बसेना, पण पुढचं ऐकायला कान तरसलेले.
“हा शिवा हाच तुझा मुलगा.” गंगूने म्हातारीचा हात हातात घेतला.
म्हातारीच्या तोंडून शब्द फुटेनात. आश्चर्य आणि आनंद यामध्ये कुठेतरी तिच्या भावना अडकल्या. चेहरा केविलवाणा झाला.
“खरंच” गंगू हसत म्हणाली.
“मला तसभी काय आठवत नाय, पन…. आसल.” शिवाकडे बघताना म्हातारीच्या डोळ्यातून पाणी तरळलं.

गंगूने आणि केश्यानी सगळी कहाणी म्हातारीला आणि शेजार्‍यांनी सांगितली. सोबत आणलेलं मेडल दाखवलं.
कोणाला आनंद झाला तर कोणाला आश्चर्य वाटलं. म्हातारीच्या आश्चर्य, प्रेम, ममता, आनंद अशा सगळ्याच भावना उफाळून आल्या. शिवाच्या डोळ्यातही पाणी दाटलं.

“आये.” अस काही पुटपुटत तो म्हातारीसमोर उभा राहीला. तिने दोन्ही हात त्याच्या डोकयावरून फिरवले. “हा दिवस बघायलाच देवानं मला अजुन जिवंत ठेवली वाटतं.”
तिच्या अश्रुंचा बांध फुटला. गंगूच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागलं. शिवाने मात्र स्वतःला सावरलं.

 

त्यादिवसापासून शिवा मोठ्या आनंदाने आपल्या आईसोबत राहू लागला. तिची काळजी घेऊ लागला. तिच्याबद्दलच्या कटू भावना त्याने मनातून काढून टाकल्या. तिच्याही जगण्याचं सार्थक झालं. झालेला स्म्रुतीभंश, आलेलं वार्धक्य तिच्या नशीबाच्या आड नाही येऊ शकले. पोटचा मुलगा इतक्या वर्षाने भेटलाच.

ह्यालाच तर नशीब म्हणतात. जे लिहिलेलं असतं ते मिळतचं. पण असं म्हणतात माणूसच स्वतःच आपलं नशीब घडवतो, आणि त्याबरोबर कधी कधी इतरांचही!

त्यानंतर शिवाने तीन-चार दिवस कामाला विश्रांती दिली.
एकदा त्याला रस्त्यात अदिलशेठ भेटला.
“क्या शिवा है किधर? दो-चार दिन आया नही तू माल लेके.” अदिलशेठने चौकशी केली.
“हां थोडा काम मे उलझा था. कलसे आयेगा.”
“ठीक है, और मैने सुना तुने तेरी झोपडी बेच दि.”
“और क्या करता, आपसेभी मांगा था, पर हुआ नही. तो कोई चाराभी नही था.”
“मैं तेरी मदत करना चाहता था खुदा की कसम, मगर तुने जो रकम मांगी थी बहुत ज्यादा थी.” आदिलशेठने त्याला समजावलं.
शिवा शांत होता.
“लेकिन हुआ क्या मां का ऑपरेशन?”
“अगले हफ्ते करनेका बोला है डॉक्टर.”
“और तेरा भाई है ना गांवेमे तेरी मांके साथ?”
“हां, उसने भी जोडा पैसा, बाकी मैने जोडा झोपडी बेचकर.”
“फिर रहता किधर अभी? फुटपाथपे?”
“नही सेठ. एक बुढियाके साथ. सिरपे छप्परके लिए कुछ ना कुछ तो करना पडेगा ना…. तो कर दिया.” शिवाने स्मित केलं आणि तिथुन चालू पडला.

 

दिवस असेच पालटत होते. म्हातारीची प्रकृतीही दिवसेंदिवस ढासळत होती. तिच्या शेवटच्या घटकेत तिच्या सोबत असणं शिवाच्या नशीबात नव्हतं. तो कामावर घराबाहेर असताना तिने प्राण सोडला. ती मरणघटका मोजत असताना गंगू मात्र तिच्यासोबत होती. म्हातारी गेल्याने तिला अतीव दुःख झाले.
शिवाने मात्र नेहमीप्रमाणे स्वतःला सावरलं. अश्रुंनी त्याच्या डोळ्याच्या कडा काही ओलांडल्या नाहित. आतुन तो निर्धास्त झाला होता. आता तो त्या खोलीचा मालक होता. सगळ्या गोष्टी जुळवून आल्यासारख्या त्याच्या पथ्यावर पडत होत्या.

त्यानंतर दोन दिवसांनी शिवा काही कामानिमित्त केश्याकडे आला. झोपडीबाहेर असताना शिवाला केश्याचा आणि गंगूचा संवाद कानी पडला.
“गंगे, आता उद्यापासून कामावर जायला सुरु कर. किती दिवस म्हातारी गेल्याचा सोक करनार अजुन? तिला जाऊन झाले की दोन दिवस.”
“तिचा माझ्यावर लय जीव होता रं. बघकी शेवटाला पन माझ्या हातूनच पानी घेतलं.”
“ते खर हाय, पन मला ह्या शिवाचं नशीब काही समजत नाय बघ, इतक्या वर्सानं त्याला आई भेटली पन महिन्या दिड महिन्यातच…. ”

गंगूने आसवं टिपली, तिचा चेहरा गंभीर झाला. “बा, जाताना आजे मला काय बोलली म्हायतेय?”
“काय?”
“की शिवा तिचा पोरगा नाही. शिवाला वाटलं की ती आई हाय त्याची पन आजेला माहीत होतं की शिवा तिचा पोरगा नाही. ती मला म्हनाली की मला मागचं काही आठवत नसलं तरी मी कधी कोनाला जन्म दिला नाही हे पक्क. पन त्या लेकराला माझ्यात त्याची आई दिसली आनि भेटली, ते पन इतक्या वर्सानं, तर कसं मोडू त्याचं मन. लेकराला त्याची आई भेटल्याचं सुख तरी मिळालं आनि मला मरायच्या आधी आई झाल्याचं! शेवटी आई ती आई असते, ती खरी खोटी नसते.”

बाहेर शिवा सुन्न, निस्तब्ध उभा होता. हालचाल होती ती फक्त दुःखाश्रुंची, यावेळी मात्र त्यांनी डोळ्यांच्या कडा ओलांडल्याच.

— समाप्त —

अहो चहा घेताय ना?

“अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.”
दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्‍यांदा चहाची आठवण करुन दिली.
कॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला गेला होता. त्यामुळे मागील वर्षी, रिटायरमेंट एज च्या सात वर्ष आधीच कामाला पूर्णविराम देऊन, सुजाताने पूर्ण वेळ आराम करायचा असं ठरवलं होतं विनायकने.
विनायक बॅंकेत मॅनेजर होता. मात्र मागील वर्षी त्यानेही नोकरी सोडली होती. कारण होतं दोघांच्या आजारपणाचं. त्याचीही तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. कमी झालेलं वजन, खोल गेलेले डोळे, दडपणाखाली असल्यासारखा, तरीही सुजातासमोर आनंदी असल्यासारखा वावरायचा. मात्र.. तो आतून खुप खचला होता. दिवस-रात्र एकच चिंता त्याला खात होती – आपल्यामागे सुजाताचं कसं होणार?

“अहो घेताय ना चहा? सकाळपासून दोनदा केला, पण अजून एकदाही घेतला नाहीत.” सुजाताने पेपरचं पान उलटलं.
एव्हाना विनायक बाथरूम मधून बेडरूममध्ये गेला होता.
आता मात्र हद्द झाली ह्यांची असं म्हणत सुजाता पेपर तसाच टेबलवर ठेवून उठली. बेडरूमपाशी येऊन दारावर टकटक करू लागली.
“अरे का मला बापडीला त्रास देतोयस तू? नाही सोसत रे मला आता दगदग. ऐक ना.”
इतरवेळी ‘अहो-जाहो’ करणार्‍या सुजाताचा स्वर क्वचित प्रसंगी ‘अरे-तुरे’ वर यायचा. विनायकलाही ते आवडायचं. त्यामुळे प्रेम, हक्क वाढल्यासारखा वाटतो असं त्याचं म्हणणं. बाकी प्रेमाशिवाय त्यांच्या संसारात दुसरं कुणीच नव्हतं. ना मुल, ना बाळ. त्यामुळे दोघंच एकमेकांचं सर्वस्व होती. दोघही अगदी रसिक. संगीत, नाटक, सिनेमासाठी हटकून वेळ काढायची. विविध विषयांवर चर्चा पण रंगतदार असायची.
मागील काही महिने मात्र घर उदासतेने भरलेलं. पूर्वीचा रसरशीतपणा आता पार सुकलेला. पूर्वीची रसिकता पार नायनापाट झालेली.

“हो. कपडे करायला वेळ तरी दे. दार उघडच आहे.”
सुजाता आत आली. विनायक आवरत होता.
“किती वेळ रे.”
“तू घेतलास का?”
“तुझ्याशिवाय? एकटीने? कधी घेतलाय का?”
“हं. आता सवय क…” उर्वरीत वाक्य त्याने गिळून टाकलं.
“काय?” कपाळावर आठ्या आणत सुजाताने विचारलं.
“काही नाही. चल मी आलो.” केसांवर कंगवा फिरवत विनायकने प्रश्न टाळला.

सुजाता बाहेर येऊन आरामखुर्चीवर बसली. तिला अस्वस्थ वाटू लागलं, कदाचित विनायकच्या बोलण्याने असावं.
ती तशीच डोकं मागे टेकवून निपचित पडून राहिली. समोर त्यांच्या लग्नानंतर काढेलेल्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोची फ्रेम होती. तिच्या चेहर्‍यावर एकदम स्मित आलं, डोळे मिटून ती मागील पाने चाळायला लागली.

‘फर्ग्युसन कॉलेज बाहेरील ते चहाचं दुकान. तिथे नेहमी येणारा विनायक आणि समोरच आमचा वाडा. काय दिवस होते ना सुंदर! पंचवीस-तीस वर्षं होत आली पण आजही आठवणी एकदम टवटवीत आहेत!
कितींदातरी विनायक तिथेच दिसायचा. तेव्हापासून हे चहाचं वेड.’
सुजाताच्या चेहर्‍यावर हास्याची रेघ उमटली.
‘पुढे डिग्री घेतल्या घेतल्या घरच्या संमतिशिवाय लग्न. काय ना आई बाबा पण, आधी खपवून घेणार नाही म्हणून सांगितलं आणि लग्नानंतर काही वर्षातच दादा इतका जवळचा वाटू लागला त्यांना विनायक. पण माझं लग्नात नटणं, सजणं राहीलच ना.’
सुजाताला आजही त्या गोष्टीची हुरहुर होतीच.
‘पुढे पुणे सोडून नोकरीसाठी मुंबईला काय आलो आणि इथलेच झालो.
नवा मित्रपरिवार मिळाला. वेळोवेळी त्यांनी खुप सपोर्ट केलं. गरज पण होतीच म्हणा कुणाच्या ना कुणाच्या सपोर्ट्ची, संकटं म्हणून तरी काय कमी आली का. बिचार्‍या विनायकने खुप खुप सोसलं. माझ्या अचानकपणे आलेलं वांझत्वाचा पण किती मोठ्या मनाने स्वीकार केला त्याने. त्याची तर किती स्वप्न होती, पण माझ्या नशीबामुळे….
त्यात मागील दोन-तीन वर्षांत डॉ. पंडितांकडे वाढलेल्या चक्करा… ते कमी होतं म्हणून की काय, त्यात ह्या दम्याच्या त्रासची भर.
किती म्हणून मनस्ताप होतोय विनायकला. आणि त्यात गेल्या वर्षी…’
सुजाता एकदम सुन्न झाली.
‘एकवेळ जे मी सोसतेय ते आनंदाने आयुष्यभर सोसलं असतं. पण…’
आणि सुजाताला त्या काळ्यादिवशीचे डॉ. जयकरांचे शब्द आठवले.
‘बातमी तितकीशी चांगली नाही. माझा संशय खरा ठरला. रिपोर्ट्स पण तेच सांगतायत. तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे. डगमगून जाऊ नका. जेवढ शक्य आहे, करुच आपण. पण… पण दुर्दैवाने सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात.’

‘विनायकने कोणाचं वाईट चिंतलही नाही, करणं तर दूर राहीलं आणि त्याला ब्लड कॅन्सर. माझ्या विनायकला… तो पण लास्ट स्टेजला. फक्त काही महिने…’
तिने डोळे उघडले, त्यातील शक्ती नाहीशी झाल्यासारखी. नजर पूर्ण हरवली होती.
‘आयुष्यभर सुख दुःख एकत्रीत भोगली, मग हा त्रास एकट्या विनायकलाच का? का… का मृत्यु आपल्याला आपल्या माणसांपासून दूर करतो? तो सुद्धा एकत्र भोगता आला असता तर…’
तिचे डोळे पाणावले. पापण्यांची उघडझाप करत ते बाहेर येणार नाहित ह्याची काळजी घेत ती पुन्हा बेडरूममध्ये आली.
विनायक पलंगावर शांतपणे पडला होता.
“अहो चहा घेताय ना?” तिने खालच्या आवाजात विचारलं, जेणेकरून तो झोपलाच असेल तर त्याची झोपमोड होणार नाही.
तिची चाहूल लागल्याने त्याने वळून पाहिले आणि कुशी पलटत विचारले “काय म्हणालीस?”
“चहा घेतोस?”
“हो चालेल, चहाला काय आपण कधीही तयार.” म्हणत तो उठून बसला.
सकाळपासून दोनदा केला, एकदाही घेतला नाही, किती मिनत्या केल्या, आणि आता म्हणे कधीही तयार. विनायकसुद्धा ना…
ती बेडरूमबाहेर पडू लागली.
‘ह्याने अजुन गोळ्याही घेतल्या नसणार’ ती पुन्हा मागे वळली आणि बघते तर…
विनायक पलंगावर नव्हता. पलंग पूर्ण रिकामा. बेडरूममध्ये कुणीही नव्हतं.
ती गडबडली, गोंधळली.
‘मला परत भास झाला की काय?’ पुटपुटत बाहेर आली.

‘तुम्ही खुप विचार करता. एखाद्या गोष्टीवर तेवढा विचार करायची गरज नसते, तरीही. जे समोर चालू आहे ते तुमचे डोळे पहात असतात, मात्र त्याचवेळी मेंदू बॅकग्राउंडला इतर कोणत्यातरी विचारात व्यग्र असतो. डोळे जे चित्र मेंदूपर्यंत पोहोचवतात त्याच इंटरप्रिटेशन करणं, तसच चालू असलेले विचार ह्यांचा गुंता होतो आणि मनात जे विचार चालू आहेत ते आपले डोळेच बघतायत असा आभास निर्माण होतो.
मेडिकली याला आम्ही ‘टॅक्टिल हॅल्युसिनेशन’ (tactile hallucination) म्हणतो. कामाचा ताण, फ्रस्ट्रेशन, चिंता, अनुवंशिकता बरीच कारण असू शकतात. हल्लीच्या काळात सर्रास अशा केसेस मिळतात. काळजीचं कारण नाही.’ – डॉ. पंडीतांनी विनायक अणि सुजाताला समजावलं होतं दोन वर्षांमागे.

सुजाताला नियमित औषधं पण चालू होती तरीही अधेमधे भास व्हायचाच. त्यामुळे भास झाल्याचं जेव्हां तिला ते जाणवायचं तेव्हा ती लगेच सावरायची, नॉर्मल व्हायचा प्रयत्न करायची.

आज मात्र तिला जरा विलक्षण वाटलं.
‘म्हणजे विनायक अजुन आलाच नाही आंघोळीहून?’ ती संभ्रमित झाली.
‘जेव्हा असं काही होईल, तेव्हां काही विचार न करता शांत चित्ताने थोडावेळ बसून किंवा पडून रहा. आणि झाल्याप्रकारावर अजिबात विचार नको. इट्स डेंजरस.’
डॉ. पंडीतांचा सल्ला तिने लगेच अंमलात आणला.
आरामखुर्चीवर शांत पडून राहिली. डोक्यातील सगळे विचार बाहेर काढले. सगळी विचारचक्र थांबवली.
तिच्या नेटाच्या प्रयत्नांना थोड यश आलं. थोड्यावेळासाठी तिचा डोळा लागला.

“सुजाता, अगं चहा देतेस ना? झाली माझी आंघोळ.”
तिला खडबडून जाग आली.
विनायकचा आवाज हा भास नाही ह्याची खात्री करण्यासाठी तिने उलट प्रश्न केला “काय म्हणालास विनायक?”
ती खुर्चीला पाठ न टेकवता अधीरतेने विनायकच्या आवाजाची वाट पाहू लागली.
पण निरव शांततेशिवाय काहिच प्रतिसाद नाही.
जाऊन नक्की काय प्रकार आहे हे पहायची तिची हिंमत होत नव्हती.
काय होतय आज असं मला? बधिरता आलीय डोक्याला. आपल्याला नक्कीच विनायकच्या आवाजाचा भास झाला याची खात्री सुजाताला पटली.
तिने खुर्चीला पाठ टेकवली आणि स्वथ पडून राहिली.

काही क्षणांतच पुन्हा एकदा विनायकचा आवाज आला “अगं चहा दे.”
तिने खाडकन डोळे उघडले. गडबडीत उठून बेडरूममध्ये आली. विनायक देवासमोर हात जोडून उभा होता. देवासमोर पेटतं निरंजन होतं.
म्हणजे इतका वेळ त्याने उत्तर दिलं नाही त्या अर्थी तो जप करत असणार. आंघोळीनंतर जप करण्याची सवय होती त्याची.
सुजाताला आत्मविश्वास आला. म्हणजे हा भास नव्हता तर!

“आज काही खरं नाही माझं.” असहायपणे सुजाता म्हणाली.
“का? काय झालं?”
“मला वाटलं आज मला पुन्हा भास झाला की काय?”
“पुन्हा म्हणजे?” अंगात शर्ट चढवत विनायकने विचारलं.
“मघाशी हो, तुम्ही पडला होतात आणि मी तुम्हाला चहा विचारायला आले होते, तुम्हाला औषध घ्यायची आठवण करायला परतून पहाते तर तुम्ही…”
“तू गोळी घे बघु आधी. चहा नंतर दे.”
“मी घेते हो, मघाशी जी आठवण करायला आले होते ते आधी करा. तुम्ही आधी घ्या गोळ्या ते जास्त महत्वाच आहे. आणि उद्या जायचंय जयकरांकडे आहे ना लक्षात?”
“हो ग बाई. एक काम करू, जयकरांची अपॉईंटमेंट मी बदलून परवाची घेतो. तुझ्या दम्याच बघ मला टेन्शन आलंय. वाढलाय हल्ली. उद्या आधी ते निस्तरू. काय ना, आजारांची नुसती व्हराईटी आहे.”
विनायकने तेव्हड्यात एक विनोद करून सुजाताला हसवण्याचा प्रयत्न केला.

सुजाता चहा करायला किचनमध्ये आली. काही विचारात असल्यासारखी होती.
“नको, आपण उद्याच जायच जयकरांकडे, दमा बरा आहे तसा. मी निभावू शकते.”
विनायक यावर काहीच बोलला नाही.
“अहो ऐकताय ना? मी काय म्हणते?”
विनायकचा आवाज नाही. सुजाता बिथरली. तिच्या श्वासांचा वेग वाढला.
“विनायक अहो बोला काहीतरी…” पण कोणाचीच चाहूल नाही.
थबकत थबकत बेडरूममध्ये आली पण तिथं कुणीच नव्हतं.
ती पूर्ण ढासळली. देवासमोर हात जोडून उभी राहिली. लक्ष गेलं तर समोरचं निरंजनही शांत होतं. तिने बाथरूमही उघडून पाहिलं पण विनायक नव्हता.
हे जरा जास्तच होतय. पण माझी खात्री आहे हा माझा भास नव्हता. जे काही झालं ते खरं होतं.
पण जर खरं होतं तर आता असं का? आणि विनायक कुठे आहे? कुठं बाहेर गेलाय की काय? गेला असेल तर मला सांगून का नाही गेला? की सांगून गेलाय आणि मला आठवत नाही? नक्कीच तो भास नव्हता, की होता? की हाच माझा भास आहे? काहीच समजतं नाही. खुप थकवा वाटतोय, पडूया जरा.

सुजाता शांत डोळे मिटुन पडून राहिली. पण डोक्यातील विचार काही जाईनात.
‘विनायक बाहेर नाही जाणार असा. मागच्याच आठवड्यात त्याची तब्येत किती बिघडली होती.
अचानक ताप किती वाढला रात्री, आणि कसा तो त्याचा श्वास अडकला. कस त्याने सहन केला इतका त्रास देव जाणे. परमेश्वरा, त्याचे सगळे आजार, त्रास, वेदना मला दे रे.’
तिने तशातच देवाला हात जोडले.
‘रात्री जेवेपर्यंत ठीक होता. नीट जेवलाही होता त्यादिवशी. त्याची आवडती मेथीची भाजी केली होती. किती दिवसांनी काही खावसं वाटतं म्हणाला होता. त्याचा आवडता चहाही झाला जेवणानंतर.
झोपलाही शांत होता, पण अचानक काय झालं नी झोपेत श्वास घ्यायला त्रास पडू लागला. वेळीच मला जाग आली म्हणून बरं.
अंग तर चटका बसावा इतकं तापलं होतं.
त्यात त्याचा ‘सुजाता, सुजाता’ आक्रोश. काय करावं सुचेना. हात पाय गळून गेले विनायकची अवस्था बघून. अंगातील ताकतच नाहीशी झाली, घामाने डबडबले मी. श्व्वास पण लागत होता.
तरी नशीब डॉक्टरांना लगेच फोन लागला. माझी तर बोबडीच वळली होती. काय बोलावं सुचेना. एकदम भिरभिरायला लागलं मला, डोळ्यासमोर अंधारी आली.
डॉक्टर काय ते समजले, लगेच येतो म्हणाले. पण मग पुढे……. काय झालं पुढे……’

 
 

दिवेलागणीची वेळ झालेली. लॅच उघडून विनायक घरात आला. खुप दमलेला, डोळे अधिकच खोल गेलेले, त्या खालील काळी वर्तूळं जास्तच गडद झाली होती.
लाईट्स, पंखा लावून तो आरामखुर्चीवर टेकला. समोर टेबल वर उघडलेला पेपर पाहून तो अवाक झाला.
‘सकाळी निघे पर्यंत तर पेपर आला नव्हता, आणि तो इथे.’ तसाच त्याने तो हातात घेतला.
त्याच पानावर एका सदराखाली सुजाताचा फोटो होता.
सदराचं नांव होतं “सहवेदना”!

तेव्हड्यात फोन वाजला. विनायक खुर्चीवरून सावकाश उठला आणि फोन घेतला.

– “हॅलो”
– “हां, बोला डॉक्टर”
– “हो आताच आलो. सकाळी लवकर निघालो होतो.” बोलताना विनायकला धाप लागली.
– “हो, तब्येत ठीक आहे.”
– “तेव्हडंच तर करु शकत होतो मी सुजातासाठी आता. पुर्वी फार इच्छा होती तिची पंचवटीला जायची, पण… राहून गेलं. निदान तिच्या अस्थितरी…” विनायकला गहिवरून आलं.
– “हो. घेतो काळजी.”
– “त्या रात्री तुम्ही वेळेत आला नसता तर… माझी अवस्था पासून सुजाताला दम्याचा अटॅक आला, तशातच तिने तुम्हाला फोन…”
– “मला मागे सोडून स्वतः पूढे निघून गेली.”
– “सावरतोय. पण असं वाटतं की ती आहे… इथेच…” विनायकने घरात एक नजर फिरवली.
– “हो. घेतो काळजी.”
– “येतो. ठीक आहे. ठेवतो.”
फोन ठेवून विनायक आरामखुर्चीत बसला.

त्याचे डोळे भरून आले.
‘सुजाता असती तर…. तर नक्की विचारलं असतं – अहो चहा घेताय ना?’

— समाप्त —