पत्रास कारण की…

ते दिवस मला आजही जसेच्या तसे आठवतायत. त्यावेळी ब-याच पोस्टल कर्मचा-यांच्या बदल्या झाल्या होत्या. माझी ही झाली आणि माझं संकट आणखी मोठं झालं. उतार वयामुळे माझ्या आईची तब्येत खूप खालावली होती. पण नशिबाने मला माझ्या त्या वेळेच्या राहत्या घरापासून तसं जवळच हलवलं गेलं. मी मूळचा राजापूरचा. राजापूर कोंकणातलं एक टुमदार गाव. आता त्याला शहर अशी ओळख मिळाली असेल, पण १९८९ मध्ये ते एक गावच होतं. माझी बदली भांबेडला झाली होती. भांबेड तसं खूप छोटं गाव, पण आजूबाजूच्या दुर्गम भागात तेच एक मोठं.

भांबेड आणि आजूबाजूची पाच-सात गावं सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेली. कोंकणाचा पूर्वेकडील अगदी शेवटचा भाग. गावातून समोरच विशाळगडचा भव्य कडा दिसायला.

भांबेडचे पोस्टाचे मास्तर होते हरी वैद्य. मध्यम वयाचे. त्यांनीच मला त्यांच्या ओळखीने पळशीकरांच्या घरामागील एक खोली भाड्याने मिळवून दिली. पोस्टही तिथून जवळच होतं. पोस्टात माझ्या व्यतिरिक्त अजून एक पोस्टमन होते – रघुवीर माळवदे. वैद्य साहेबांनी पहिल्या दिवशीच मी आणि माळवदे कोणते प्रभाग करणार हे निश्चित केलं. मला आजूबाजूचा परिसर तसा ऐकून माहीत होताच. दिवसात वाटायची पत्रही खूप नसायची. हा, फक्त आजूबाजूच्या दोन-चार फर्लांगावर असलेल्या गावतही सायकल ताबडवत जायला लागायचं एवढंच.

हळू हळू मी रुळत होतो, परिसराशी जमवून घेत होतो. थोड्याफार ओळखीही होत होत्या. चहावाला किसन, भुसारी किराणावाले सतारशेठ वगैरे मंडळी जवळची झालेली. आसपासची गांवही एक दोनदा फिरून झालेली.

असंच एक गाव होतं.. प्रभानवल्ली. भांबेडपासुन ४ फर्लांगावर. मुचकुंदि नदीच्या काठी वसलेलं, सहा सात वाड्यांचं एक छोटंसं गाव.

मला आठवतंय, त्या दिवशी प्रभानवल्लीला जायची माझी पहिलीच वेळ होती. प्रभानवल्लीच्या पोलिस पाटीलांचं एक रजिस्टर्ड पत्र आणि त्याच मार्गावर असलेल्या कोर्ले ह्या गावची काही पत्रं होती. मी ती घेतली आणि माझ्या दप्तरात भरली. किसन कडे एक चहा घेऊन आलो आणि मार्गस्थ झालो. कोर्लेतील पत्रं वाटून, प्रभानवल्लीला पोलिस पाटील जमदाडेंच्या घरी पोचलो.

जमदाडेंशी ती माझी पहिलीच भेट. माणूस मोठा उमदा वाटला. मी ह्या भागातील नवीन पोस्टमन म्हटल्यावर, त्यांनी माझी विचारपूस केली.
“कुठले तुम्ही?”
“मी राजापुरचा. दोन वर्षांमागेच नोकरी सुरू केली.”
“घरी कोण असतं राजापूरला?”
“आई आहे,बायको आहे, धाकटा भाऊ आहे. वडील गेले दोन वर्षांमागे.”
“मग बायको तिकडेच का?”
“हो. आईची तब्येत बरी नसते. बाकी कामं पण आहेत. म्हशी आहेत, चार घरचा रतीब आहे. माझी आठवड्याला फेरी असते.”
“बरं, भांबेडला कुठे राहता?”
“पळशीकरांच्या खोलीत.”
“पळशीकर म्हणजे दिगंबर पळशीकरांपैकी?”
“हो हो.”
“माझं आठवड्याला येणं असतं भांबेडला. गुरुवारचा बाजार असतो ना भांबेडला.”
“हो.”
“जेवण्या खाण्याचं कसं मग?”
“शिजवतो खोलीवर मीच.”
“बापरे हालच की हो एकट्याने राहायचं, जेवण-खाण करायचं.”
“काय करणार. पर्याय नाही.”


जमदाडेंनी आपुलकीने चहा पाजला. पत्र देऊन, मी त्यांचा निरोप घेतला. उंबरठा ओलांडताच मला लक्षात आलं की मी पोच पावतीवर जमदाडेंची सही घेतली नव्हती. मी तसाच मागे वळलो. सही घेण्यासाठी दप्तरातील वही काढली आणि मला थोडं आश्चर्य वाटलं. दप्तरात एक पोस्टकार्ड होतं. प्रभानवल्लीत तर एकच पत्र होतं, जे मी जमदाडेंना सुपूर्त केलेलं. कोर्ले मध्ये पत्र द्यायचं राहिलं असेल असं समजत मी पत्र बाहेर काढलं. पण त्यावर प्रभानवल्लीचाच पत्ता होता.
“कसं शक्य आहे?”
माझं पुटपुटणं जमदाडेंच्या कानावर पडलं. “काय झालं?”
“विशेष काही नाही, मी पोस्टातून निघताना हे पत्र दप्तरात नव्हतं. आणि आता.. द्यायचं तुमचं एकच पत्र होतं. मग हे कुठून आलं. कोर्लेत पत्रं वाटताना आणि तुमचं पत्र देताना हे पत्र दप्तरात नव्हतं. मला खात्रीशिर आठवतंय.”
जमदाडेंनी हसण्यावारी नेलं. “ही तर भुताटकीच म्हणायची.” ते पुन्हा एकदा मोठ्यांदा हसले.
मी पण जास्त विचार न करता त्या कार्डावरील नाव पाहिलं.
“पाटील साहेब, हे नरेंद्र गणू सातपुते कुठे राहतात?”
“म्हणजे ते भुताटकीचं पत्र न-याचं आहे होय.” जमदाडेंची थट्टा अजून सुरूच होती.
मीही अवघडून स्मित केलं.
“इथनं सरळ जा ग्रामपंचायतीपर्यंत. तिथून खालच्या अंगाला नदीपर्यंत जा. तिथच आहे सातपुतेचं घर.”

मी ग्रामपंचायतीपर्यंत पोचलो. सायकल तिथे उभी करून, चालतच सुतारवाडी मधलं सातपुतेचं घर शोधलं.
घर, अगदी जुने, ओबढधोबड खांबांनी टेकू दिलेले, जीर्णशीर्ण भिंतीचे, घर. मी निवडुंगाच्या वेशीलगोलग असलेल्या बांबुच्या फाटकातून आत गेलो. बाहेरील ओसरीवर एक इसम बसला होता.
“नरेंद्र सातपुते, पत्र..”
तो निर्विकारपणे जागचा उठला.
“पत्र.”
मी कार्ड त्याच्या हातात ठेवलं. तितक्यात एका बाईने, बहुदा त्याची बायको असावी, दारातून डोकावलं. मी न बघितल्यासारखं केलं आणि तिथून चालू पडलो.

का कुणास ठाऊक पण ते घर एकदम निर्जीव वाटलं. त्या घराची अवकळा, तिथली उदास माणसं की आणखी काही, मला नव्हतं माहित. सायकल घेतली आणि थेट भांबेड गाठलं.

त्या दिवशी मी थोडा बेचैनच होतो. संध्याकाळी, तिथली ग्रामदेवता, आदिष्ठीदेवीच्या देवळात जाऊन बसलो. मनाची घालमेल थोडी कमी झाली. रात्री लवकरच झोपलो.

त्यानंतर दोन एक दिवस झाली असतील. मी सकाळीच पोस्टात गेलो होतो. नवीन पत्रांचं स्टॅम्पिंग करून, किसनकडे सकाळच्या चहाला गेलो.
“किसनभाऊ चहा द्या.” किसनने चहा दिला.
“अहो तुम्हाला कळलं असेलच ना?” किसनच्या प्रश्नाचा रोख मला समजला नव्हता.
“कशाबद्दल बोलतोयस?”
“प्रभानवल्लीतले सातपुत्यांबद्दल.”
“त्यांचं काय झालं?”
“त्यांना परवा पत्र आलं म्हणे.”
“हा मग?”
“अहो काल बाजाराचा दिवस होता, प्रभानवल्लीतील बरीचशी लोकं येतात बाजाराला. त्यांनी सांगितलं की ते पत्र आबा सातपुतेंचं पत्र होतं.”
“नाही रे, ते नरेंद्र का कुणी.. हा नरेंद्रच.. नरेंद्र सातपुतेचं होतं.”
“नाही नाही, तसं नाही. ते आबा सातपुतेंनी पाठवलेलं म्हणे. त्यांच्या लेकाला.”
“असेल. मग त्यात काय एव्हडं?”
किसन आवासून माझ्याकडे बघत होता.
“बापाने पोराला पत्र लिहिलं तर त्यात काय? लोकं पण ना..” मी उपहासात्मक हसलो आणि चहाचा घोट घेतला.
“तुम्ही आताच इकडे बदलून आलात, तुम्हाला माहीत नसेल. आबा म्हणजे गणू सातपुतेचा महिन्याभरापूर्वी खून झालाय.”
“काय?”
“पंचक्रोशीतला पहिला खून. माहितेय.” किसन बोलतच होता.
मला एकदम धक्काच बसला. माझ्या हातातला कप खाली पडला.
“अर्रर्र. असूदेत.”
“कशावरून त्याच्या बापाचं पत्र? कुणीपण लिहू शकतं ना बापाच्या नावाने.” मी स्वतःच्या समाधानासाठी शंका काढली.
“आपल्याला काय माहीत बा. लोकं बोलत होती ते सांगितलं. पण कोण कशाला करेल ना असला उद्योग तो पण गेलेल्या माणसाच्या नावानं.” किसनने पडलेला कप उचलला आणि इतर गि-हाईकांमध्ये गुंतला.

किसनचं म्हणणं खरंच होतं म्हणा. कोण कशाला करेल असलं काय. पण जर इतर कोणी हे नसेल केलं तर?.. ह्याचा अर्थ जो काही होत होता तो मानायला मन बिथरत होतं. शक्यच नव्हतं… की… होतं?

होता होता ही बातमी वा-यासारखी चहुबाजूला पसरली. वैद्य, सतारशेठ, पणशीकर, आजूबाजूचे इतर सगळ्यांकडून प्रकाराची विचारणा होत होती.
वैद्यांनी माझ्याकडून परत परत खात्री करून घेतली की त्या दिवशी ते पत्र आधी दप्तरात नव्हतं, पोलिस पाटिलांच्या घरात मला त्याचा उलगडा झाला होता वगैरे.
काही लोकांना हा कुणाचातरी हलकटपणा वाटला, तर भूत पिशाच्च मानणा-या ब-याच लोकांना हे काहीतरी विपरीत आहे असं वाटलं.

हे सगळं होत असताना पत्रात नक्की काय लिहिलंय हा प्रश्न वैद्य सोडता कुणालाच पडला नाही. दुस-या दिवशी त्यांना पडलेल्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर त्यांना मिळालं. त्या दिवशी जमदाडे पोस्टात आले, ते पत्र सोबत घेऊनच.

वैद्यांनी ते पत्र नीट न्याहाळलं आणि वाचलं.
“मास्तर, हा काय प्रकार आहे नक्की. गावात सगळीकडे ह्याचीच चर्चा.”
“कार्डावर दोन्ही मोहर आहेत. ही त्या दिवशीची, ह्याच पोस्टाची. पण दुसरी मोहर स्पष्ट नाही तेव्हडी. कुठून आलं हे सांगणं कठीण आहे.”
“काल सरपंच आलेले माझ्याकडे. झाला प्रकार ऐकून ते न-याकडे गेलेले, त्यांनी हे कार्ड त्याच्याकडून आणलं आणि मला देऊन, इकडे पाठवलं आणि काय ते छडा लावायला सांगितला. आता मी काय छडा लावणार?”
“हम्म्म्म.” वैद्यांनी सुस्कारा सोडला.

वैद्यांनी ते पत्र माझ्याकडे दिलं. त्यातील मजकूर साधारण मला आठवतोय.


चि. नरेंद्र,

मी तुझा आबा. तुझा विश्वास बसणार नाही. कसा आहेस पोरा? मी गेल्याने खूप दुःख झालं असेल ना. पण कोलमडून जाऊ नकोस. तुझ्या आईला सांभाळ. मी गेल्याने ती एकटी पडली असेल. तिची काळजी घे रे पोरा. तुझ्यासाठी खूप काही करू नाही शकलो. माफी कर मला.
सूनबाईला आणि पोरांना सांभाळ.

तुमचा,
आबाते मोडक्या तोडक्या अक्षरातील कार्ड वाचून मी बावचळलो. माझ्या समोर जे होतं त्यावर माझा विश्वास नव्हता.
“हे कसं शक्य आहे, पाटीलसाहेब?”
“माझ्या घरी आलेलात त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात, की हे पत्र आधी नव्हत आणि अचानक ते दप्तरात गावलं तुम्हाला. काय समजत नाही. हे काहीतरी विपरीत आहे.”
“हो. मी पण खात्री करून घेतलीय ह्याची.” वैद्यांनी खुलासा केला.
“मला वाटतं की म्हाता-याचा जीव अडकलाय कशाततरी. त्याच्या पिंडाला पण कावळा नव्हता शिवला.” जमदाडेंची नजर शून्यांत हरवलेली.
“बरं मी असं ऐकलं की त्यांचा खून झाला होता. कोणी केलेला?” वैद्यांच्या प्रश्नाने ते भानावर आले.
“अं… ते… नाही कळाल. तालुक्याहून पोलिस आलेले, पण काही नाही सापडलं.”
जमदाडे निघून गेले.

नंतर काही दिवस सगळं शांत होतं. लोकं विसरले होते किंवा विषय चघळून चघळून अगदी चोथा झाला होता. दरम्याने माझंही प्रभानवल्लीला जाणं नव्हतं झालं.

पंधरा तीन आठवडे झाले असतील, प्रभानवल्लीत कुणाचीतरी मनिऑर्डर आली होती. ती द्यायला मी गेलो होतो.
मनिऑर्डर योग्य माणसाच्या हाती सोपवून दप्तरात पाहिलं तर… माझ्या काळजाचा थरकाप उडाला, मी फक्त कोसळायचाच शिल्लक होतो. मनिऑर्डर घेणा-याने मला आधार दिला.

त्या दिवशीही नरेंद्र गणू सातपुतेच्या नावाने अजून एक पत्र माझ्या दप्तरात होतं. काय करावं मला सुचेना. सातपुतेच्या घरी जावं का सरळ भांबेड गाठावं मला कळेना.

पण पहिल्या पत्रानंतर ज्या शंकाकुशंका काढल्या जात होत्या त्या पाहता, ते पत्र सातपुतेच्या हाती न देण्याची हिंमत माझ्या ठायी नव्हती. मी सातपुतेच्या घरी गेलो. त्या दिवशी मात्र घराचं दार बंद होतं. मला एका अर्थाने माझी ती सुटकाच होत. मला कोणाला सामोरं जायचं नव्हतं. मी दार न वाजवता पत्र दाराखालून आत सरकवलं. आणि लगबगीने तिथून चालू पडलो.

ग्रामपंचायतीकडे आलो ते दोन चार नजरा कुतूहलाने मला हेरत होत्या. बहुदा त्यांना काही अंदाज आला होता. मी तिथून चालू पडलो, एकच अपेक्षा होती, ते पत्र आबा सातपुतेंचं नसावं, ज्याची शक्यता नगण्य होती.

दुस-या दिवशी किसनकडेच मला बातमी लागली, मी आदल्या दिवशी देऊन आलेल्या पत्राची. ते पत्रही आबा सातपुतेचं होतं. ह्यावेळी मला खूप आश्चर्य नाही वाटलं. किसनला मी पत्रातील मजकुराबद्दल काही ठाऊक आहे का विचारलं पण त्याला काही ठाऊक नव्हतं.

संध्याकाळच्या सुमारास वैद्यांनी मला बोलावलं. विषय अर्थातच सातपुते, आणि ते पत्र.
“हो कालही तेच. मी तिकडे असतानाच दप्तरात पत्र दिसलं.” मी हतबल होत वैद्यांना म्हणालो.
“कालच्या पत्रात काय लिहिलं होतं माहितेय, तू वाचलंस?”
“कसं शक्य आहे, कोणाचं पत्र वाचणं?”
“हम्म्म्म.. मलाही मघाशीच कळालं, एकजण आला होता प्रभानवल्लीहून. त्यात लिहिलं होतं की मी, म्हणजे आबा सातपुतेंनी सरपंचाकडून काही कर्ज घेतलं होतं पोरीच्या लग्नासाठी, जमीन गहाण ठेवून.”
“सरपंचाकडून कर्ज?” ती गोष्ट मला तितकी रुचली नव्हती.
“अरे, सरपंचाचा सावकारी हा मुख्य व्यवसाय असं ऐकलंय मी. आजूबाजूच्या सगळ्या गावात तो एकच सावकारी करणारा. तर आता इतकी खासगी बाब पत्रात लिहिलीय म्हणजे बघ.”
मी निरुत्तर होतो. बोलायला काहीच नव्हतं.

“हे सगळं जे चाललंय, ते एका गोष्टीकडेच बोट दाखवतायत.” वैद्य खूप गंभीरपणे म्हणाले.
“कोणत्या?” त्यांना नक्की काय म्हणायचं मला समजलं नव्हतं.
“आबा घुटमळतोय.”

जे काही चाललं होतं ते बुद्धीच्या पलीकडचं होतं आणि मी ही त्याचा एक भाग होतो. मला भांबेडात थोडं अस्वस्थ वाटू लागलं. ह्याची कल्पना मी वैद्यांना दिली आणि चार दिवसाची रजा टाकून राजापूरला आलो. घरच्या लोकांसोबत सगळ्याचा थोडा विसर पडायला मदत झाली हे जरी खरं होतं तरी, कामावर रुजू व्हायला मन धजावत नव्हतं, पण नाईलाज होता. मी ठरल्या दिवशी भांबेडला परतलो.

“मला आता प्रभानवल्ली नको. कृपा करा.” मी वैद्यांसमोर फक्त हात जोडायचा बाकी होतो.
त्यांनी आधी आढेवेढे घेतले. मला आणि माळवदेला नवीन भाग म्हणजे कामं सावकाश होणार, ह्याच्यावरच ते अडून बसले. पण सरते शेवटी माझी विनंती त्यांनी मान्य केली.
माळवदेला थोडे दिवसांसाठी प्रभानवल्ली, कोर्ले दिलं आणि मला नेरवणे च्या आसपासचा भाग मिळाला.

त्या दिवसात माळवदेला प्रभानवल्लीला जायची गरज पडली नाही. मी पण नवीन भागात जमवून घेतलं. दरम्यान, त्याची चुलती का कुणीतरी आजारी पडली, तिला घेऊन त्याला शहरात जावं लागलं. माझ्यावर कामाचा ताण वाढला.

त्या दिवशी स्टॅम्पिंग करायच्या पत्रांत मला प्रभानवल्लीच्या प्राथमिक शाळेचं पत्र दिसलं. मी ते बाजूला काढलं आणि वैद्यांना माझी अडचण सांगितली.
“अरे काय बोलतोयस? पत्र द्यायचं नाही माळवदे येईपर्यंत?”
मी शांत उभा होतो.
“राज्य शिक्षण मंडळाकडून आलेलं पत्र आहे.” हातातील लखोटा नीट न्याहाळत वैद्य म्हणाले.
“मग गावातल्या कोणासोबत पाठवलं तर नाही का चाल्…..” वाक्य पूर्णं करण्याची माझी हिंमत झाली नाही .
“काय बोलतोयस. जरा जबाबदारीने बोल. तू प्रभानवल्लीला जातोयस आजच्या आज. ह्या पत्राचं गांभीर्य लक्षात घे.” माझ्याकडे बोलण्यासारखं काहीच नव्हतं. निमूटपणे इतर टपालांसोबत ते पत्र मी दप्तरात ठेवलं आणि पोस्टातून बाहेर पडलो.

प्रभानवल्लीला जाताना मनाची धाकधूक वाढत होती. शाळेच्या बाहेरच मला जमदाडे भेटले. थोडे गंभीर वाटले.
“बरेच दिवसांनी येणं झालं पोस्टमन.”
“हो. सध्या मला नेरवणे गावचा भाग दिलाय.” एव्हाना चार आठ गावक-यांनी आमच्या बाजूला कोंढाळं केलं होतं.
“आणि दुसरा रजेवर आहे म्हणून आज आलो.” मी शाळेचं पत्र काढण्यासाठी दप्तर उघडलं आणि…
“काय झालं?” माझा धास्तावलेला चेहरा पाहून जमदाडेंनी विचारलं.
मी कपाळावरील धर्मबिंदू शर्टाच्या बाहीने टिपले, माझ्या घशाला कोरड पडली. पाठीच्या कण्यातून एक शिरशिरी गेली. हातात बळ नसल्यासारखं, अत्यंत संथ गतीने, शाळेच्या लखोट्यासोबत असलेलं ‘ते’ पत्र मी बाहेर काढलं.
“आज पण?” – जमदाडे.
माझ्या तोंडून शब्द फुटेना. मी जड पावलांनी शाळेत जाऊन लखोटा देऊन आलो. तोपर्यंत अजून थोडे गावकरी जमलेले, त्यांत नरेंद्र सातपुते पण होता. ‘ते’ पत्र मी नरेंद्रच्या हाती सोपवलं. गावक-यांत कुजबूज सुरू झाली.
जमदाडेंनी सगळ्यांना मागे हटवलं आणि नरेंद्रच्या जवळ आले.
“काय लिहिलंय?” जमदाडेंनी बिथरलेल्या नरेंद्रला विचारलं.
“वाचतो.” नरेंद्रने आवंढा गिळत हळू आवाजात वाचायला सुरुवात केली.चि. नरेंद्र,

खूप घुसमट होतेय रे माझी. खूप अस्वस्थ वाटतंय. तुमच्यासाठी रक्ताचा घाम करून, पै पै साठवून घेतलेल्या जमिनीलाच तुम्ही वंचित झालात. मी जे सावकाराकडून ८००० चं कर्ज घेतलं होतं, ते मी हळू हळू फेडलं होतं. पण तो काही जमिनीचे कागद द्यायला तयार नव्हता. खूप वेळ प्रयत्न केला आपण पण तो दाद देत नव्हता.

त्या संध्याकाळी, मी पोलिसात तक्रार नोंदवणार हे त्याला सांगितलं. पण त्याच रात्री, नदीकाठी, सावकार आणि त्याच्या दोन माणसांनी मला गाठलं. मला लाठ्यांनी मारलं. तुला खूप आवाज दिला पण तू नव्हतास. खूप वेदना झाल्या रे आणि नंतर… हळू हळू वेदना कमी पण झाल्या, मला झोप आली, खूप झोप आली.. इतकी की मला जागच राहता येईना…

मी आता परत नाही येऊ शकत. आता तुला खंबीर होऊन सगळ्यांना सांभाळायचं आणि त्याने बळकावलेली माझी जमीन परत मिळवायचीय..

तुझा,
आबा


सगळ्यांच्याच चेह-यावर विस्मयाचे भाव होते. जमदाडेंचा चेहरा मात्र धीरगंभीर. त्यांनी एक लांब सुस्कारा सोडला.
“म्हणजे हे पत्र वगैरे सगळं… आबांना आपल्याला हे सांगायचं होतं?” – नरेंद्र
जमदाडेंनी नरेंद्रच्या खांद्यावर हात ठेवला.

त्यानंतर कित्येक दिवस ह्याच विषयाची चर्चा रंगली. सरपंचही कुठे पळून गेला. लवकरच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. कुठलाही साक्षीदार नव्हता, तरीही सरपंचाने गुन्हा मान्य केला. म्हणे आबा त्याला स्वप्नात दिसायला लागले होते. सगळ्या सांगोवांगी गोष्टी होत्या. कोर्टात त्याच्यावर खटला चालू होता.

दरम्यान माझी बदली पुन्हा राजापूरला झाली. बदलीसाठी वैद्यांनी विशेष प्रयत्न केले. माझीही ओढाताण संपली.
त्यानंतर खटल्याचा निकाल लागला. सरपंचाला गुन्हा मान्य असल्याने निकालात अडथळे नाही आले. त्याला आणि त्याच्या दोन माणसांना जन्मठेपेची शिक्षा झाली.


मला आठवतंय, निकाल लागल्याच्या दुस-याच दिवशी संध्याकाळी राजापूरच्या घराचा दरवाजा वाजला. उघडला तर.. समोर एक बाई.. तीच जी मला प्रभानावल्लीत सातपुतेंच्या घरी दिसलेली.
मी तिच्याकडे नुसता बघत बसलो. आश्चर्याचा भर ओसरला तसे माझ्या तोंडातून शब्द फुटले.. “ताई तू?”
ती नुसतीच हसली.
“आणि इतक्या उशीरा संध्याकाळी? आणि भावोजी कुठे आहेत?”
“आलेत ना. हे काय आलेच.” घराच्या पाय-या चढून नरेंद्र आत आले.
“भावोजी, या.” मी त्यांच्या हातातील पिशव्या घेतल्या.
माझ्या पत्नीने पाण्याचा तांब्या आणला.
“कसं चालू आहे बाकी? ब-याच महिन्यांनी येणं झालं ना.”
“आबांच्या जाण्यानंतर आज, जवळ जवळ दिड-एक वर्षांनी गावाच्या बाहेर पडलोय.”
“हो. बरं तुम्ही हातपाय धुऊन घ्या, तोवर ही चहा टाकेल.”

चहापाणी झालं. ताई हिच्यासोबत आत आईकडे होती. मी आणि भावोजी खळ्यांत (अंगणात) बसलो.
बराच वेळ शांततेत गेला. मग मीच सुरुवात केली.
“माफ करा, पण आबांच्या वेळी तुम्हाला भेटायला यायला जमलं नाही मला आईच्या आजारपणामुळे. कोणाला तरी इथे थांबायचंच होतं, मग मी थांबलो इथेच आणि बंडूला पाठवला.”
“अरे माफी कसली मागतोयस? उलट त्यामुळेच हे रामायण घडू शकलं. तू जे केलंस, ते मला जन्मात शक्य झालं नसतं.” भावोजींच्या चेह-यावरसमाधान होतं.
“पण त्यामुळेच मला दिवसकार्याला पण येता नाही आलं.” माझी खंत मी बोलून दाखवली.
“मला इतके दिवस गुदमरल्यासारखं झालं होतं, तुला भेटता पण नाही आलं. आज तुझ्यामुळे तो खुनी सरपंच तुरुंगात आहे आणि माझी काहीच मदत नव्हती तुला.” भावोजी कृतज्ञेच्या सुरात म्हणाले.
“त्या दिवशी एकीकडे हातात बदलीची ऑर्डर आली आणि दुसरीकडे आबांचं हे अस झालं हे कळलं. दोन दिवसांनी बंडू ज्यावेळी प्रभानवल्लीहून परतला, त्यावेळी तुम्ही त्याला सांगितलेली सगळी हकिकत मला कळली.”
“खूप त्रास झाला रे. कर्ज फेडून सुद्धा आबांना जमिनीचे कागद देत नव्हता सरपंच. रस्त्यालगतची जागा, ती कशाला सोडतोय तो. आबांनी, मी खूप जोर दिला. पण तो कुठला दाद देतोय गरिबाला. त्या दिवशी नदीकाठी तडफडत होते रे, माझ्या समोर. डोकं खूप तापलं होतं माझं, पण मी दुबळा काय लढणार होतो सरपंचाशी? मी प्रत्यक्ष तर खून नव्हता ना पहिला. शेवटच्या क्षणांत आबांनी सांगितलेल्यावर काय न्याय देणार होतो मी त्यांना? खूप वाकडं पाऊल उचललं असतं, पण आई, तुझी ताई, दोन लेकरं ह्याचं पुढे काय, हि चिंता होतीच.. मी हतबल झालो रे.” भावोजींचे डोळे पाणावले.
“खरं आहे तुमचं भावोजी. त्यावेळी जे काही सुचलं ते तुम्हाला बंडूमार्फत लगेच कळवलं. वाटलं, इतका राकट, पैशाच्या ताकतीने माजलेला माणूस, अदृश्य शक्तीला नक्की घाबरेल, शरण येईल.”
“आणि तो आला.” भावोजी समाधानाने म्हणाले.
“बरं जमिनीचे कागद, गहाणखत मिळालं ना?”
“हो. पण मला एक नाही कळालं, शेवटचं जे पत्र तू दिलंस, त्यात तू कर्जाची रक्कम लिहिली होतीस. ती तर मलाही माहीत नव्हती. आबा म्हणायचे तू कशाला चिंता करतोस मी आहे ना तायडीचं लग्न करून देण्यासाठी, लेकीच्या लग्नाचं कर्ज मीच फेडणार. पुढे जेव्हा सरपंचाला पकडला आणि पोलिसांनी मला गहाणखत दिलं तेव्हा मला कर्जाची रक्कम समजली. पण मग तुला कशी समजली?”

मी काही क्षण निरुत्तर होतो.
“पहिली दोन पत्रं मी लिहिली, डाव्या हाताने. पण तिसरं पत्र मी नव्हतं लिहिलं.”
“म्हणजे?”
“काय लिहावं हे मला सुचत नव्हतं. मला अचानक प्रभानवल्लीला यावं लागलं, शाळेचं पत्र होतं म्हणून. आणि… आणि त्यावेळी ‘ते’ पत्र माझ्या दप्तरात होतं. ते कसं आणि कुठून आलं, हे मला आजपर्यंत समजलं नाहीये.”

त्यानंतर बराच वेळ आम्ही दोघेही शांत बसून होतो. तिन्हीसांज रात्रीकडे कधीच झुकली होती, रातकिड्यांची किरकिर सुरू झालेली, बाकी सगळीकडे निरव शांतता होती.

— समाप्त —


मिसळपाववरील प्रतिसाद – http://www.misalpav.com/node/25113#comments

मायबोलीवरील प्रतिसाद – http://www.maayboli.com/node/44020#comments

Advertisements

अहो चहा घेताय ना?

“अहो चहा घेताय ना? निवतोय तो, किती वेळ लावायचा आंघोळीला.”
दाराखालून आत सरकवलेला पेपर उचलत सुजाताने विनायकला सकाळपासून दुसर्‍यांदा चहाची आठवण करुन दिली.
कॉलेज मधुन स्वेच्छानिवृत्ती घेतल्यापासून सुजाताला निदान पेपर तरी चाळायला वेळ मिळू लागला होता. होय स्वेच्छानिवृत्ती. कारणंच तशी होती त्याची. सुजाताची तब्येत ठिक नसायची. दम्याचा विकार गेल्या एक-दोन वर्षांत पार विकोपाला गेला होता. त्यामुळे मागील वर्षी, रिटायरमेंट एज च्या सात वर्ष आधीच कामाला पूर्णविराम देऊन, सुजाताने पूर्ण वेळ आराम करायचा असं ठरवलं होतं विनायकने.
विनायक बॅंकेत मॅनेजर होता. मात्र मागील वर्षी त्यानेही नोकरी सोडली होती. कारण होतं दोघांच्या आजारपणाचं. त्याचीही तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती. कमी झालेलं वजन, खोल गेलेले डोळे, दडपणाखाली असल्यासारखा, तरीही सुजातासमोर आनंदी असल्यासारखा वावरायचा. मात्र.. तो आतून खुप खचला होता. दिवस-रात्र एकच चिंता त्याला खात होती – आपल्यामागे सुजाताचं कसं होणार?

“अहो घेताय ना चहा? सकाळपासून दोनदा केला, पण अजून एकदाही घेतला नाहीत.” सुजाताने पेपरचं पान उलटलं.
एव्हाना विनायक बाथरूम मधून बेडरूममध्ये गेला होता.
आता मात्र हद्द झाली ह्यांची असं म्हणत सुजाता पेपर तसाच टेबलवर ठेवून उठली. बेडरूमपाशी येऊन दारावर टकटक करू लागली.
“अरे का मला बापडीला त्रास देतोयस तू? नाही सोसत रे मला आता दगदग. ऐक ना.”
इतरवेळी ‘अहो-जाहो’ करणार्‍या सुजाताचा स्वर क्वचित प्रसंगी ‘अरे-तुरे’ वर यायचा. विनायकलाही ते आवडायचं. त्यामुळे प्रेम, हक्क वाढल्यासारखा वाटतो असं त्याचं म्हणणं. बाकी प्रेमाशिवाय त्यांच्या संसारात दुसरं कुणीच नव्हतं. ना मुल, ना बाळ. त्यामुळे दोघंच एकमेकांचं सर्वस्व होती. दोघही अगदी रसिक. संगीत, नाटक, सिनेमासाठी हटकून वेळ काढायची. विविध विषयांवर चर्चा पण रंगतदार असायची.
मागील काही महिने मात्र घर उदासतेने भरलेलं. पूर्वीचा रसरशीतपणा आता पार सुकलेला. पूर्वीची रसिकता पार नायनापाट झालेली.

“हो. कपडे करायला वेळ तरी दे. दार उघडच आहे.”
सुजाता आत आली. विनायक आवरत होता.
“किती वेळ रे.”
“तू घेतलास का?”
“तुझ्याशिवाय? एकटीने? कधी घेतलाय का?”
“हं. आता सवय क…” उर्वरीत वाक्य त्याने गिळून टाकलं.
“काय?” कपाळावर आठ्या आणत सुजाताने विचारलं.
“काही नाही. चल मी आलो.” केसांवर कंगवा फिरवत विनायकने प्रश्न टाळला.

सुजाता बाहेर येऊन आरामखुर्चीवर बसली. तिला अस्वस्थ वाटू लागलं, कदाचित विनायकच्या बोलण्याने असावं.
ती तशीच डोकं मागे टेकवून निपचित पडून राहिली. समोर त्यांच्या लग्नानंतर काढेलेल्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोची फ्रेम होती. तिच्या चेहर्‍यावर एकदम स्मित आलं, डोळे मिटून ती मागील पाने चाळायला लागली.

‘फर्ग्युसन कॉलेज बाहेरील ते चहाचं दुकान. तिथे नेहमी येणारा विनायक आणि समोरच आमचा वाडा. काय दिवस होते ना सुंदर! पंचवीस-तीस वर्षं होत आली पण आजही आठवणी एकदम टवटवीत आहेत!
कितींदातरी विनायक तिथेच दिसायचा. तेव्हापासून हे चहाचं वेड.’
सुजाताच्या चेहर्‍यावर हास्याची रेघ उमटली.
‘पुढे डिग्री घेतल्या घेतल्या घरच्या संमतिशिवाय लग्न. काय ना आई बाबा पण, आधी खपवून घेणार नाही म्हणून सांगितलं आणि लग्नानंतर काही वर्षातच दादा इतका जवळचा वाटू लागला त्यांना विनायक. पण माझं लग्नात नटणं, सजणं राहीलच ना.’
सुजाताला आजही त्या गोष्टीची हुरहुर होतीच.
‘पुढे पुणे सोडून नोकरीसाठी मुंबईला काय आलो आणि इथलेच झालो.
नवा मित्रपरिवार मिळाला. वेळोवेळी त्यांनी खुप सपोर्ट केलं. गरज पण होतीच म्हणा कुणाच्या ना कुणाच्या सपोर्ट्ची, संकटं म्हणून तरी काय कमी आली का. बिचार्‍या विनायकने खुप खुप सोसलं. माझ्या अचानकपणे आलेलं वांझत्वाचा पण किती मोठ्या मनाने स्वीकार केला त्याने. त्याची तर किती स्वप्न होती, पण माझ्या नशीबामुळे….
त्यात मागील दोन-तीन वर्षांत डॉ. पंडितांकडे वाढलेल्या चक्करा… ते कमी होतं म्हणून की काय, त्यात ह्या दम्याच्या त्रासची भर.
किती म्हणून मनस्ताप होतोय विनायकला. आणि त्यात गेल्या वर्षी…’
सुजाता एकदम सुन्न झाली.
‘एकवेळ जे मी सोसतेय ते आनंदाने आयुष्यभर सोसलं असतं. पण…’
आणि सुजाताला त्या काळ्यादिवशीचे डॉ. जयकरांचे शब्द आठवले.
‘बातमी तितकीशी चांगली नाही. माझा संशय खरा ठरला. रिपोर्ट्स पण तेच सांगतायत. तुम्ही खंबीर राहिलं पाहिजे. डगमगून जाऊ नका. जेवढ शक्य आहे, करुच आपण. पण… पण दुर्दैवाने सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात.’

‘विनायकने कोणाचं वाईट चिंतलही नाही, करणं तर दूर राहीलं आणि त्याला ब्लड कॅन्सर. माझ्या विनायकला… तो पण लास्ट स्टेजला. फक्त काही महिने…’
तिने डोळे उघडले, त्यातील शक्ती नाहीशी झाल्यासारखी. नजर पूर्ण हरवली होती.
‘आयुष्यभर सुख दुःख एकत्रीत भोगली, मग हा त्रास एकट्या विनायकलाच का? का… का मृत्यु आपल्याला आपल्या माणसांपासून दूर करतो? तो सुद्धा एकत्र भोगता आला असता तर…’
तिचे डोळे पाणावले. पापण्यांची उघडझाप करत ते बाहेर येणार नाहित ह्याची काळजी घेत ती पुन्हा बेडरूममध्ये आली.
विनायक पलंगावर शांतपणे पडला होता.
“अहो चहा घेताय ना?” तिने खालच्या आवाजात विचारलं, जेणेकरून तो झोपलाच असेल तर त्याची झोपमोड होणार नाही.
तिची चाहूल लागल्याने त्याने वळून पाहिले आणि कुशी पलटत विचारले “काय म्हणालीस?”
“चहा घेतोस?”
“हो चालेल, चहाला काय आपण कधीही तयार.” म्हणत तो उठून बसला.
सकाळपासून दोनदा केला, एकदाही घेतला नाही, किती मिनत्या केल्या, आणि आता म्हणे कधीही तयार. विनायकसुद्धा ना…
ती बेडरूमबाहेर पडू लागली.
‘ह्याने अजुन गोळ्याही घेतल्या नसणार’ ती पुन्हा मागे वळली आणि बघते तर…
विनायक पलंगावर नव्हता. पलंग पूर्ण रिकामा. बेडरूममध्ये कुणीही नव्हतं.
ती गडबडली, गोंधळली.
‘मला परत भास झाला की काय?’ पुटपुटत बाहेर आली.

‘तुम्ही खुप विचार करता. एखाद्या गोष्टीवर तेवढा विचार करायची गरज नसते, तरीही. जे समोर चालू आहे ते तुमचे डोळे पहात असतात, मात्र त्याचवेळी मेंदू बॅकग्राउंडला इतर कोणत्यातरी विचारात व्यग्र असतो. डोळे जे चित्र मेंदूपर्यंत पोहोचवतात त्याच इंटरप्रिटेशन करणं, तसच चालू असलेले विचार ह्यांचा गुंता होतो आणि मनात जे विचार चालू आहेत ते आपले डोळेच बघतायत असा आभास निर्माण होतो.
मेडिकली याला आम्ही ‘टॅक्टिल हॅल्युसिनेशन’ (tactile hallucination) म्हणतो. कामाचा ताण, फ्रस्ट्रेशन, चिंता, अनुवंशिकता बरीच कारण असू शकतात. हल्लीच्या काळात सर्रास अशा केसेस मिळतात. काळजीचं कारण नाही.’ – डॉ. पंडीतांनी विनायक अणि सुजाताला समजावलं होतं दोन वर्षांमागे.

सुजाताला नियमित औषधं पण चालू होती तरीही अधेमधे भास व्हायचाच. त्यामुळे भास झाल्याचं जेव्हां तिला ते जाणवायचं तेव्हा ती लगेच सावरायची, नॉर्मल व्हायचा प्रयत्न करायची.

आज मात्र तिला जरा विलक्षण वाटलं.
‘म्हणजे विनायक अजुन आलाच नाही आंघोळीहून?’ ती संभ्रमित झाली.
‘जेव्हा असं काही होईल, तेव्हां काही विचार न करता शांत चित्ताने थोडावेळ बसून किंवा पडून रहा. आणि झाल्याप्रकारावर अजिबात विचार नको. इट्स डेंजरस.’
डॉ. पंडीतांचा सल्ला तिने लगेच अंमलात आणला.
आरामखुर्चीवर शांत पडून राहिली. डोक्यातील सगळे विचार बाहेर काढले. सगळी विचारचक्र थांबवली.
तिच्या नेटाच्या प्रयत्नांना थोड यश आलं. थोड्यावेळासाठी तिचा डोळा लागला.

“सुजाता, अगं चहा देतेस ना? झाली माझी आंघोळ.”
तिला खडबडून जाग आली.
विनायकचा आवाज हा भास नाही ह्याची खात्री करण्यासाठी तिने उलट प्रश्न केला “काय म्हणालास विनायक?”
ती खुर्चीला पाठ न टेकवता अधीरतेने विनायकच्या आवाजाची वाट पाहू लागली.
पण निरव शांततेशिवाय काहिच प्रतिसाद नाही.
जाऊन नक्की काय प्रकार आहे हे पहायची तिची हिंमत होत नव्हती.
काय होतय आज असं मला? बधिरता आलीय डोक्याला. आपल्याला नक्कीच विनायकच्या आवाजाचा भास झाला याची खात्री सुजाताला पटली.
तिने खुर्चीला पाठ टेकवली आणि स्वथ पडून राहिली.

काही क्षणांतच पुन्हा एकदा विनायकचा आवाज आला “अगं चहा दे.”
तिने खाडकन डोळे उघडले. गडबडीत उठून बेडरूममध्ये आली. विनायक देवासमोर हात जोडून उभा होता. देवासमोर पेटतं निरंजन होतं.
म्हणजे इतका वेळ त्याने उत्तर दिलं नाही त्या अर्थी तो जप करत असणार. आंघोळीनंतर जप करण्याची सवय होती त्याची.
सुजाताला आत्मविश्वास आला. म्हणजे हा भास नव्हता तर!

“आज काही खरं नाही माझं.” असहायपणे सुजाता म्हणाली.
“का? काय झालं?”
“मला वाटलं आज मला पुन्हा भास झाला की काय?”
“पुन्हा म्हणजे?” अंगात शर्ट चढवत विनायकने विचारलं.
“मघाशी हो, तुम्ही पडला होतात आणि मी तुम्हाला चहा विचारायला आले होते, तुम्हाला औषध घ्यायची आठवण करायला परतून पहाते तर तुम्ही…”
“तू गोळी घे बघु आधी. चहा नंतर दे.”
“मी घेते हो, मघाशी जी आठवण करायला आले होते ते आधी करा. तुम्ही आधी घ्या गोळ्या ते जास्त महत्वाच आहे. आणि उद्या जायचंय जयकरांकडे आहे ना लक्षात?”
“हो ग बाई. एक काम करू, जयकरांची अपॉईंटमेंट मी बदलून परवाची घेतो. तुझ्या दम्याच बघ मला टेन्शन आलंय. वाढलाय हल्ली. उद्या आधी ते निस्तरू. काय ना, आजारांची नुसती व्हराईटी आहे.”
विनायकने तेव्हड्यात एक विनोद करून सुजाताला हसवण्याचा प्रयत्न केला.

सुजाता चहा करायला किचनमध्ये आली. काही विचारात असल्यासारखी होती.
“नको, आपण उद्याच जायच जयकरांकडे, दमा बरा आहे तसा. मी निभावू शकते.”
विनायक यावर काहीच बोलला नाही.
“अहो ऐकताय ना? मी काय म्हणते?”
विनायकचा आवाज नाही. सुजाता बिथरली. तिच्या श्वासांचा वेग वाढला.
“विनायक अहो बोला काहीतरी…” पण कोणाचीच चाहूल नाही.
थबकत थबकत बेडरूममध्ये आली पण तिथं कुणीच नव्हतं.
ती पूर्ण ढासळली. देवासमोर हात जोडून उभी राहिली. लक्ष गेलं तर समोरचं निरंजनही शांत होतं. तिने बाथरूमही उघडून पाहिलं पण विनायक नव्हता.
हे जरा जास्तच होतय. पण माझी खात्री आहे हा माझा भास नव्हता. जे काही झालं ते खरं होतं.
पण जर खरं होतं तर आता असं का? आणि विनायक कुठे आहे? कुठं बाहेर गेलाय की काय? गेला असेल तर मला सांगून का नाही गेला? की सांगून गेलाय आणि मला आठवत नाही? नक्कीच तो भास नव्हता, की होता? की हाच माझा भास आहे? काहीच समजतं नाही. खुप थकवा वाटतोय, पडूया जरा.

सुजाता शांत डोळे मिटुन पडून राहिली. पण डोक्यातील विचार काही जाईनात.
‘विनायक बाहेर नाही जाणार असा. मागच्याच आठवड्यात त्याची तब्येत किती बिघडली होती.
अचानक ताप किती वाढला रात्री, आणि कसा तो त्याचा श्वास अडकला. कस त्याने सहन केला इतका त्रास देव जाणे. परमेश्वरा, त्याचे सगळे आजार, त्रास, वेदना मला दे रे.’
तिने तशातच देवाला हात जोडले.
‘रात्री जेवेपर्यंत ठीक होता. नीट जेवलाही होता त्यादिवशी. त्याची आवडती मेथीची भाजी केली होती. किती दिवसांनी काही खावसं वाटतं म्हणाला होता. त्याचा आवडता चहाही झाला जेवणानंतर.
झोपलाही शांत होता, पण अचानक काय झालं नी झोपेत श्वास घ्यायला त्रास पडू लागला. वेळीच मला जाग आली म्हणून बरं.
अंग तर चटका बसावा इतकं तापलं होतं.
त्यात त्याचा ‘सुजाता, सुजाता’ आक्रोश. काय करावं सुचेना. हात पाय गळून गेले विनायकची अवस्था बघून. अंगातील ताकतच नाहीशी झाली, घामाने डबडबले मी. श्व्वास पण लागत होता.
तरी नशीब डॉक्टरांना लगेच फोन लागला. माझी तर बोबडीच वळली होती. काय बोलावं सुचेना. एकदम भिरभिरायला लागलं मला, डोळ्यासमोर अंधारी आली.
डॉक्टर काय ते समजले, लगेच येतो म्हणाले. पण मग पुढे……. काय झालं पुढे……’

 
 

दिवेलागणीची वेळ झालेली. लॅच उघडून विनायक घरात आला. खुप दमलेला, डोळे अधिकच खोल गेलेले, त्या खालील काळी वर्तूळं जास्तच गडद झाली होती.
लाईट्स, पंखा लावून तो आरामखुर्चीवर टेकला. समोर टेबल वर उघडलेला पेपर पाहून तो अवाक झाला.
‘सकाळी निघे पर्यंत तर पेपर आला नव्हता, आणि तो इथे.’ तसाच त्याने तो हातात घेतला.
त्याच पानावर एका सदराखाली सुजाताचा फोटो होता.
सदराचं नांव होतं “सहवेदना”!

तेव्हड्यात फोन वाजला. विनायक खुर्चीवरून सावकाश उठला आणि फोन घेतला.

– “हॅलो”
– “हां, बोला डॉक्टर”
– “हो आताच आलो. सकाळी लवकर निघालो होतो.” बोलताना विनायकला धाप लागली.
– “हो, तब्येत ठीक आहे.”
– “तेव्हडंच तर करु शकत होतो मी सुजातासाठी आता. पुर्वी फार इच्छा होती तिची पंचवटीला जायची, पण… राहून गेलं. निदान तिच्या अस्थितरी…” विनायकला गहिवरून आलं.
– “हो. घेतो काळजी.”
– “त्या रात्री तुम्ही वेळेत आला नसता तर… माझी अवस्था पासून सुजाताला दम्याचा अटॅक आला, तशातच तिने तुम्हाला फोन…”
– “मला मागे सोडून स्वतः पूढे निघून गेली.”
– “सावरतोय. पण असं वाटतं की ती आहे… इथेच…” विनायकने घरात एक नजर फिरवली.
– “हो. घेतो काळजी.”
– “येतो. ठीक आहे. ठेवतो.”
फोन ठेवून विनायक आरामखुर्चीत बसला.

त्याचे डोळे भरून आले.
‘सुजाता असती तर…. तर नक्की विचारलं असतं – अहो चहा घेताय ना?’

— समाप्त —

त्या रात्री पाऊस होता..

        ट्रींग ट्रींगsss…..ट्रींग ट्रींगsss….. टेलीफोन खणखणला. इतक्या वादळी रात्री त्याचं वाजणं जरा आश्चर्याचच होतं. मध्यरात्रीची वेळ, पाऊस तर धोधो कोसळत होता, त्याच्या साथीला कडाडणार्‍या विजा, वेडावाकडा सैरावैरा पळणारा वारा रात्रीला अजुन रौद्र करत होते. तशात लाईट्स गेलेले म्हटल्यावर काळोख अजुन भयाण वाटत होता. प्रकाश असला तर त्याच्या साम्राज्यात आपण आपलं एक जग तयार करतो मात्र त्याच्या बाहेरच्या काळोखी जगापासून आपण खुप अनभिज्ञ असतो. टेलीफोनच्या आवाजाने गाढ झोपलेल्या डॉक्टरांना जाग आली. डोळे चोळत त्यांनी काळोखात फोनच्या बाजुला असलेलं घड्याळ पाहिलं. लख्खपणे चमकलेल्या एका विजेच्या प्रकाशात त्यांना घडाळ्यातील काट्यांच दर्शन झालं. तशातच त्यांनी फोन उचलला.

“हॅलो”
“हेलो, डाक्टर साहेबांशी बोलायचय.”
“बोलतोय. आपण?”
“साहेब मी सखाराम बोलतोय. ताडगांव वरुन. माझी पोरगी लय आजारी हाय.”
“काय होतय तिला?”
“तापान तव्यासारखी तापलिया, तुम्ही येऊन बघा जरा. लय मेहेरबनी व्हइल.”
“इतक्या रात्री?” डॉक्टरांनी नकारात्मक पवित्रा घेत प्रश्न केला.
समोरुन काहीच उत्तर न आल्याने स्वतःच पुढे म्हणाले, “अहो रात्रीचे दोन वाजतायत आणि पाऊस पण फार आहे. मी सकाळी येऊन जाईन.”
“साहेब आजारपण येळ आनी हंगाम बघुन कुठ येतय. लय नड हाय. तिचं हाल व्हतायत, उपकार करा. तुमच्याबद्दल लय ऐकुन हाय, निराश नका करु साहेब.”
वैद्यकी निदानासाठी तसेच माणूसकीसाठी अल्पावधीत प्रसिद्ध झालेले डॉक्टर विनवणी टाळू शकले नाहीत.
“ताडगाव ला कसं यायचं सांगा, मी ह्या गावी नवीन असल्याने मला आजुबाजुचा भाग तितकासा माहीत नाही.”
“साहेब तुमच्या गावापासून वारम गावाचा रस्ता धरा, थिरवळच्या फाट्यावर आत या,  २-३ मैलांवर आजुन एक कच्चा रस्ता दिसल, तिथुन आत आलात की ८ मैलावर ताडगांव. साहेब गावात आलात की लगच गनपतीच मंदिर लागल त्याला लागुन हाय माझं घर.”
थोडे संभ्रमित असतानाही स्वतःकडे असलेल्या कारच्या आधारावर डॉक्टरांनी जाण्याचा निर्णय घेतला, पण पाऊसाची आणि अनोळख्या भागाची चिंता होतीच. ताडगावचा मार्ग जरी लक्षात आला असला तरी गरज पडल्यास रस्त्यात कोणाला ना कोणाला मार्ग विचारुन गावी पोहोचता येईल असा विचार त्यांनी केला.
“ठीक आहे, मला यायला साधारण दिड एक तास लागेल अस वाटतय, पाऊसामुळे खुप व्यत्यय नाही आला तर. ठीक आहे?”
“धन्यवाद साहेब, आज काही आडचन न्हाई येनार.”
“मी येईपर्यंत मुलीच्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत रहा. मी निघतो लगेच.”
“बर साहेब.”

        डॉक्टरांनी पटकन जायची तयारी केली, बॅग, टोंर्च, छ्त्री घेतली आणि दाराला कुलुप करुन मोटार सरकारी क्वार्टर्स बाहेर काढली. थोड्याचवेळात गाडी वारम गावी जायच्या रस्त्याला लागली जो भाग डॉक्टरांना खुप ज्ञात नव्हता. रस्ता अगदी अरुंद, दोन्ही बाजुला गच्च झाडी. पंचक्रोषित एकच सरकारी दवाखाना असल्याने रुग्णांकडून भागातील गांवांची नांवे डॉक्टरांना फक्त थोडीफार ऐकुन माहीत मात्र प्रत्यक्ष जायची ही पहिलीच वेळ होती.

        पाऊसाचा जोर वाढला होता, अगदी ढगफुटी व्हावी तसा. जोराच्या वार्‍यामुळे रस्त्यावर झाडांची पाने गळुन पडत होती, रस्त्यावर पाण्याचे झोत वाहत होते आणि त्या पाण्याला चिरत गाडी पुढे जात होती. सर्वत्र भयाण, गुढ काळोख. खेडेगावांत तसेही रस्त्यावर दिवे नसतात, आणि असते तरी खुप काही फरक पडणार नव्हता. अशा परिस्थितीत गाडी चालवायचं काम मोठ जिकरीचं होतं आणि डॉक्टर मोठ्या काळजीपूर्वक गाडी चालवित होते. रस्ता अगदी सामसुम, फक्त वीजा-पाऊसाचा कर्कष्य आवाज. समोरचा रस्ता स्पष्ट दिसतही नव्हता. खुप अवेळ असल्याने डॉक्टर आधीच अस्वस्थ होते आणि त्यात भयाण वातावरण भर घालत होतं.

        आता त्यांच पहिलं ध्येय होतं ते म्हणजे थिरवळ गावाचा फाटा गाठणं, त्यानंतर जेमतेम १०-१२ मैलांचा पल्ला गाठायचा होता. पण पाऊण एक तास उलटला तरी थिरवळचा रस्ता काही लागेना, त्यांची बेचैनी वाढत चालली होती. रस्त्याला मैलाचे दगडही नसल्याने त्यांच्या अडचणीत भर पडली होती. रस्त्याला कोणीही दिसलं तरी रस्ता विचारायचा हे त्यांनी ठरवलं पण रस्त्याच्या आजुबाजुला कुठेही वस्ती दिसत नव्हती आणि अशावेळी रस्त्यावर कोणी दिसण्याचा प्रश्नच नव्हता. समोरुन किंवा मागुन येणारं कोणतं वाहन पण दिसत नव्हतं. वेळ खुप कठीण होती. मनात थोडी धाकधुक. मी सोबत कोणा माहीतगार माणसाला आणायला हवं होतं असा एक विचार मनाला चाटुन गेला.

        डॉक्टरांनी अजुन थोडं अंतर कापलं. पुढे गेल्यावर रस्त्याला असलेल्या डाव्या बाजुच्या फाट्यामुळे त्यांची बेचैनी कमी झाली खरी पण खुप वेळेसाठी नाही, कारण त्याच ठिकाणी उजवीकडे अजुन एक फाटा होता. त्यांना अशा वादळी रात्री रस्ता चुकायचा नव्हता, कोणाला तरी त्यांच्या वेळेवर पोहोचण्याची नितांत गरज होती. पण केवळ नशीब बलवत्तर म्हणून त्याठिकाणी एक व्यक्ती उभी होती. वादळी पावसात एका छ्त्रीचा आश्रय घेत. थोडी अचंब्यात टाकणारी असली तरी तितकाच दिलासा देणारी गोष्ट होती कारण क्वार्टर्स मधुन बाहेर पडल्यापासून त्यांना दिसलेली ही पहिली व्यक्ती होती. तरी त्यांच्या मनात घालमेल सुरु झाली, ह्या निर्जन ठिकाणी हा एकटा उभा आहे, काय करावं? ह्याला विचारावं का? आजुबाजुला पाहिलं तर रस्त्याला फलक पण नव्हते. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.

        त्यांनी गाडी त्याच्याजवळ थांबवली, आणि टोंर्च चालू करुन खिडकीची काच खाली केली. टोंर्चच्या प्रकाशात जमेल तितक न्याहाळत त्यांनी त्याला प्रश्न केला.
“ह्यातला थिरवळचा फाटा कोणता?”
त्याच्याकडून गूढ शांततेशिवाय काहीच प्रतिसाद नाही मिळाला. पाऊसाच्या आवाजात त्याला नीट ऐकु आलं नसावं म्हणून डॉक्टरांनी चढ्या आवाजात परत प्रश्न केला.
“ह्यातला थिरवळ गावचा रस्ता कोणता?”
यावेळी त्याच्याकडून त्यांना प्रतिसाद मिळाला तो हाताच्या हालचालीच्या रुपात. त्याने हाताने डाव्या रस्त्याकडे बोट दाखवत उत्तर दिलं.
डॉक्टरांना थोडा धीर आला. खात्रीसाठी परत त्यांनी त्या रस्त्याकडे बोट दाखवत विचारल “हा रस्ता?”
आता त्याने उत्तरादाखल फक्त मान हलवली. अधिक माहितीसाठी त्यांनी विचारलं “ताडगांव किती लांब आहे अजुन?”
ह्यावेळी त्याने मान आणि खांदा ह्यात छत्रीचा दांडा धरुन दोन्ही हाताची दहाही बोटे दाखवत तोंडाने “अ आ..  आ आ..” असे विचित्र आवाज काढत मान २-३ वेळा हलवली. डॉक्टरांना एकुण सगळ चमत्कारीक वाटलं पण समजायच ते समजुन त्यांनी “थँक यु” म्हटलं आणि भांबावलेल्या नजरेने त्याला बघत काच वर केली. तो मात्र निर्विकार, स्तब्ध, गंभीर व तितकाच खंबीर, निर्जन ठिकाणी मध्यरात्रीच्या वेळी धो धो कोसळणारया पावसाचा फारसा परिणाम न होणारा.

        डॉक्टरांनी गाडी त्याने सांगितलेल्या रस्त्यावर वळवली. एका हाताने खिशातील रुमाल काढुन चेहरयावर पडलेल पाणी पुसत ते त्या माणसाबद्द्ल विचार करु लागले. तो माणूस जवळ जवळ पूर्ण भिजलेला, अंगात मळकट अंगरखा, लेंगा, दाढीचे खुंट वाढलेले, बारिक पांढरे केस, केविलवाणे डोळे, चेहरयावर ओसंडून वाहणारी गरिबी. हा यावेळी एकटा इथे काय करत असेल? आजुबाजुला घर असावं असं वाटत तर नाही, बस थांबा पण दिसला नाही. डॉक्टरांना त्याचं गुढ वाटलं, तसच थोड वाईटही. आधीच इतकी खडतर परिस्थिती आणि त्यात तो मुका असावा. ह्या क्षेत्रात आणि ग्रामिण भागात त्यांनी ह्यापेक्षा बेजार लोकं पाहिली होती, पण याला पाहून त्यांना काहितरी विलक्षण वाटलं हे खरं.
त्यांच्या मनात विचार चालू झाले. “अस काय झालं असाव की त्याला ह्यावेळी कोसळत्या पावसात इथे उभं रहायला लागलं. त्याला मदतीसाठी विचारलं पाहिजे होतं का? पण तो विचित्र पण वाटत होता आणि त्या मुलीकडे पण पोहोचायचय वेळेत. असो.” असा विचार करुन त्यांनी गाडी रस्त्यात लागलेल्या पहिल्या कच्च्या रस्त्याला वळवली.

        आतला भाग खुपच दुर्गम वाटत होता. रस्ताही दगड मातीचा असल्याने सावकाश जाण्याशिवाय पर्याय नव्हता. पण आता ७-८ मैलांनंतर ताडगाव येणार आणि त्या मुलीचे उपचार होणार म्हणून त्यांना समाधानही वाटत होतं. त्यांची बेचैनी पण थोडी कमी झाली. पावसाचा जोर थोडा मंदावला. साधारण ७-८ मैल झाल्यावर सखारामने सांगितल्यानुसार त्यांना रस्त्यात मंदिर लागलं. खुप उशीर झाला नव्हता, नियोजित वेळेनुसार डॉक्टर पोहोचले होते. त्यांनी गाडी मंदिराच्या समोर थांबवली. बॅग, छ्त्री घेतली व टोंर्च चालू करुन गाडीतून उतरले आणि बाजुच्या घराच्या दिशेने पायवाटेचा मार्ग काढू लागले.  गाडीचा आवाज ऐकल्याने, एव्हाना घराचा दरवाजा उघडून कोणीतरी कंदिल हातात घेउन उभं असलेलं त्यांना दिसलं. चालता चालता सहज त्यांनी मंदिरात डोकावलं, समईच्या प्रकाशात शेंदूर फासलेली मारूतीची मूर्ती तेजस्वी दिसत होती. उजवा हात छातीला लावून नमस्कार करत, “जय बजरंगबली!” पुटपुटत ते घरासमोर पोहोचले आणि थबकले.

        ‘सखारामने तर गणपतीचं मंदिर सांगितल होतं ना, पत्ता ऐँकण्यात माझी काही चुक झाली का? असेल कदाचित, इतर कोणतं मंदिर तर दिसलं नाही रस्तात.’ तोच हातात कंदील घेतलेली ती व्यक्ती पुढे आली. तो एक १४-१५ वर्षांचा मुलगा होता. त्याला पुढे आलेलं पाहुन डॉक्टरांनी प्रश्न केला, “पेशंट कुठे आहे?” मुलगा म्हणाला, “आत.” डॉक्टरांच्या हातातली बॅग घेऊन त्याने दरवाजा पूर्ण उघडला, “या.”

        डॉक्टर आत आले. कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशातही दारिद्र्य उठून दिसत होतं. एका खाटेवर ८-१० वर्षाची मुलगी अंगावर घोंगडी ओढुन झोपली होती. तिच्या उशाशी एक बाई बसलेली, तिची आई असावी. घरात इतर कोणीच नव्हतं, सखाराम पण नव्हता. मुलगा बाईला म्हणाला “मामी, डाक्टर आलेत बघ.” बाई जागेवरुन उठुन उभी राहीली. कमी उजेड आणि चेहर्‍यावरचा पदर यामुळे तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तरी मुलीच्या आजारपणाच्या तणावाखाली असल्यासारखी, उदास. डॉक्टर मुलीच्या बाजुला खाटेवर बसले, मुलाने बॅग त्यांच्या बाजुला ठेवली.

“कधीपासुन आहे ताप?” डॉक्टरांनी नाडी बघण्यासाठी मुलीचा हात हातात घेत विचारलं
“द..दोन हफ्त झालं.” बाई खालच्या आवाजात आणि अडखळत म्हणाली.
“इतके दिवस अंगावर का काढले? आधीच का नाही आणलं दवाखान्यात?” डॉक्टरांनी तिचे डोळे तपासत विचारलं.
बाई गप्प.
डॉक्टरांनी मुलीच्या छातीला स्तेथोस्कोप लावून पाहिलं, थर्मोमीटरने तिचा ताप पाहिला.
ती अगदी मलुल, चेहरा उतरलेला. “जीभ काढ बाहेर.”
तिने मोठ्या त्रासाने तोंड उघडलं. तपासुन झाल्यावर डॉक्टरांना टायफाईडची लक्षणे जाणवली.
“डोकं दुखतय का?” डॉक्टरांनी तिला विचारलं. मुलीने होकारार्थी मान हलवली.
“अंग?” उत्तरादाखल तिने परत मान हलवली.
“मळमळ वाटतेय? अजुन काही वाटतय का?” ती गप्प.
“बर, काय काय खाल्ल दिवसभरात?”
ती गप्प, “जरा भात खाल्ला.” आईने उत्तर दिलं.
“बरं मला वाटतं टायफाईड असावा, घाबरुन जायची गरज नाही, उद्या तिला दवाखान्यात आणा, मग उपचाराला सुरुवात करु. आराम मिळावा म्हणून एक इंजेकशन देतो आता.”
मुलीचा चेहरा इंजेकशनचं नाव ऐकुन रडवेला झाला, तिच लक्ष दुसरीकडे वळवायला डॉक्टरांनी विचारलं,
“शाळेत जातेस का तू?” तिच्याकडून काहीच उत्तर नाही.
“नांव काय तुझं?” परत एक प्रश्न केला.
ती शांतच. “शेवंती” त्या मुलाने उत्तर दिलं.
“बर उद्या यायचं हा दवाखन्यात, आणि लगेच बरं व्हायचं. येणार ना?” डॉक्टरांनी स्मित हास्य करत तिला विचारलं.
ती शांतच.
“तिला बोलता येत नाही.” तिचा भाऊ मागुन बोलला.
डॉक्टरांनी स्वाभाविक प्रतिक्रीया दिली “ओह..”
“बरं, मी काही गोळ्या देतो, आता तिला द्या एक, शांत झोपुदे तिला, सकाळी १० वाजता आणा तिला सरकारी दवाखान्यात. मग अजुन तपासणी करु. काळजी करु नका. ठीक आहे?” डॉक्टरांनी विश्वास देत म्हटलं. इतक्या अडचणी पार करुन हेतू साध्य करण्याचा तणाव त्यांच्या चेहर्‍यावरुन निघुन गेलेला.
“बरं.” मुलगा म्हणाला.
“पण हिला कशामुळे बोलता येत नाही?” बॅग भरताना डॉक्टरांनी कुतुहलाने तिच्या आईला विचारलं.
“जन्मापासूनच, तिच्या बा कडून तिला आलय हे.” तिच्या आईने खालच्या आवाजात उत्तर दिलं.
“बरं, मी निघतो आता.” गडबडीत बॅग बंद करत डॉक्टर म्हणाले आणि उभे राहीले.
अचानक त्यांना काहितरी जाणवलं, चेहर्‍यावर आठ्या पडल्या. “काय?” हैराण होत त्यांनी विचारलं.
अधिक खोलात न शिरता त्यांनी पुढील प्रश्न केला “हिचे वडील कुठे गेले.”
बाई आणि मुलगा शांत. डॉक्टरांनी पुन्हा त्याच प्रश्नाच्या अनुशंगाने “आं?” केल.
बाई स्तब्ध, मुलगा उत्तरला “ते ….” त्याला मध्येच तोडत डॉक्टर म्हणाले “त्यांनी मला फोन…..” इतकच बोलुन काहितरी विचार करु लागले.
“काय?” बाईने आश्चर्याने आणि मोठ्याने विचारलं.
डॉक्टर चपापले. ते अजुन काही स्पष्टीकरण देणार तोच…… तोच…… लाईट्स आले, लख्खपणे घरातील एक बल्ब पेटला, काळोखाचं साम्राज्य संपल आणि डॉक्टर सुन्न झाले, स्तब्ध झाले, हैराण झाले.

        समोरच्या भिंतीवर एक तसबीर लटकवली होती, फुलांचा हार घातलेली तसबीर, त्या तसबीरीत त्याचा फोटो होता. जे डोळ्यासमोर होतं त्यावर डॉक्टरांचा विश्वास बसेना. ‘ह्याचा फोटो? तिच दाढी, तेच केस, तेच डोळे, तोच चेहरा, हा तोच… ज्याने मला रस्ता दाखवला. पण कसं शक्य आहे?’ त्यानीं त्रासिक नजरेने बाईकडे पाहीलं, आणि तिच ते पांढर कपाळ पाहून ते खाटेचा आधार घेत खालीच बसले. मुलाने त्यांना आधार दिला.
“काय झालं?” त्याने डॉक्टरांना विचारलं.
“हा.. हा कोणाचा फोटो आहे?” डॉक्टरांनी श्वास रोखत विचारलं.
“माझ्या मामांचा. दोन हप्त्यांमाग गेला तो.” मुलगा म्हणाला.
“कसं शक्य आहे? ह्यानेच तर मला थिरवळ फाट्यावरुन इथे ताडगावला यायच रस्ता दाखवला. ह्याचं… ह्याचं नांव सखाराम ना?” डॉक्टर पुटपुटले.
“नाही, माझा मामा लखोबा आणि हे ताडगांव नाही, अंबापूर आहे. ताडगांव वारमच्या तिकडच्या अंगाला राहीलं.” मुलगा हात हलवत बोलला.
आणि थिरवळ फाट्यापासूनचा सगळा प्रवास क्षणार्धांत डॉक्टरांच्या डोळ्यासमोरुन सरकला. जे काही समोर आलं त्यावर त्यांचा विश्वास बसेना.

म्हणजे पत्ता ऐकण्यात माझ्याकडून चुक नव्हती तर…
ह्या मुलीच्या तापाला दोन आठवडे झाले आणि लखोबाला जाऊन पण…
अनुवंशिकतेने तिला आलेलं मुकेपण…
त्याने मला ह्या गावी, ह्या घरी आणलं… हो त्यानेच जो जिवंत नाही आहे…
आणि वादळी मध्यरात्री त्या निर्जन ठिकाणी तो काय करत होता.. ह्याच उत्तर त्यांना मिळालं..

        ते थोडावेळ निर्विकार, निष्क्रीय बसुन राहीले. जे काही अनुभवलं ते पचनी पडायला वेळ लागत होता. शेवटी आपलं प्रकाशाचं विश्व खुप लहान आहे, बाहेरील विशाल काळोखी विश्व आपल्या आकलनशक्तीच्या खुप बाहेर आहे हे जाणलं, मानलं आणि ते घराबाहेर पडले. पाऊस पूर्ण थांबला होता, आकाश पण स्वछ होत होतं. त्यांनी गाडी सुरु केली. उजाडायला सुरुवात झालेली. थोड्यावेळात ते थिरवळचा फाट्यांवर पोहोचले जिथे लखोबा भेटला होता. आता तिथे कोणीच नव्हतं. ते क्षणभर थांबले, आणि त्यांनी गाडी उजव्या रस्त्याला ताडगांवच्या दिशेला वळवली.

 

— समाप्त —